"कृषी क्षेत्रात सुधारणा होऊ नयेत यासाठी शरद पवार, मनमोहन सिंग यांच्यावर होता दबाव"
By मोरेश्वर येरम | Published: December 28, 2020 06:12 PM2020-12-28T18:12:01+5:302020-12-28T18:13:52+5:30
कृषी कायद्यांसंदर्भात शेतकरी संघटनांसोबत चर्चा करण्याच्या एक दिवस आधीच तोमर यांनी हे विधान केलं आहे.
नवी दिल्ली
नव्या कृषी कायद्यांवरुन देशात गदारोळ सुरू असताना आता केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी खळबळजनक विधान करुन नव्या वादाला तोंड फोडलं आहे. "कृषी क्षेत्रात सुधारणा होऊ नयेत यासाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि तत्कालीन कृषीमंत्री शरद पवार यांच्यावर बाहेरी शक्तींचा दबाव होता", असा आरोप नरेंद्रसिंह तोमर यांनी केला आहे.
"देशात अनेक आयोग, मंत्री, मुख्यमंत्री आणि सरकारांनी कृषी क्षेत्रात सुधारणेसाठी प्रयत्न केले. यूपीएच्या कार्यकाळात डॉ. मनमोहन सिंग आणि कृषीमंत्री शरद पवार यांना कृषी कायदे लागू करायचे होते. पण काही लोकांच्या दबावामुळे ते कायदे लागू करू शकले नाहीत", असं नरेंद्रसिंह तोमर म्हणाले.
कृषी कायद्यांसंदर्भात शेतकरी संघटनांसोबत चर्चा करण्याच्या एक दिवस आधीच तोमर यांनी हे विधान केलं आहे. सरकारने शेतकरी संघटनांसोबत पुन्हा एकदा चर्चेची तयारी दाखवली आहे. विविध शेतकरी संघटनांच्या एका संयुक्त समितीने आज कृषी कायद्यांना समर्थन देण्यासंदर्भात भेट घेतली.
"पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विकास हेच एकमेव मिशन आहे. ते नेहमी जनतेच्या फायद्याचा विचार करत असतात आणि कोणत्याही प्रकारची शक्ती पंतप्रधानांवर दबाव आणू शकत नाहीत", असं तोमर यावेळी म्हणाले.