आंदाेलनावरून पंतप्रधान माेदींचा विराेधकांवर जोरदार हल्ला; नव्या कायद्याच्या समर्थनार्थ जाेरदार बॅटींग
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2020 04:30 AM2020-12-01T04:30:59+5:302020-12-01T07:49:59+5:30
माेदींनी आकडेवारीचा दाखला देताना सांगितले, स्वामीनाथ आयाेगाच्या शिफारसीनुसार उत्पादन मूल्याच्या दीड पट हमीभाव देत असल्याचेही माेदी म्हणाले
वाराणसी : नव्या कृषी कायद्याविराेधात दिल्लीच्या वेशीवर आलेल्या शेतकऱ्यांनी आंदाेलन आणखी तीव्र करण्याचा निर्धार केला. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी या कायद्याचे जाेरदार समर्थन करत विराेधकांवर कडाडून हल्ला चढविला. विराेधक अफवा पसरवित असल्याची टीका माेदींनी केली. प्रयागराज आणि वाराणसी शहरांना जाेडणाऱ्या सहा पदरी महामार्गाचे लाेकार्पण त्यांनी केले. त्यावेळी ते बाेलत हाेते.
पंतप्रधानांनी नव्या कायद्याच्या समर्थनार्थ जाेरदार बॅटींग केली. कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांना नवे पर्याय मिळतील असे सांगतांनाच ते म्हणाले, आतापर्यंत ज्यांनी शेतकऱ्यांचे नुकसान केले तेच संभ्रम निर्माण करत आहेत. याच लाेकांनी कर्जमाफीच्या नावानेही शेतकऱ्यांची फसवणूक केली. दिल्ली-काेलकाता शहरांना जाेडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गातील सहा पदरी महामार्ग एक प्रमुख टप्पा आहे. त्याचे माेदींनी लाेकार्पण केले. ७२.६४ किलाेमीटर लांबीचा हा टप्पा असून २४४७ काेटी रुपयांचा खर्च त्यासाठी झाला आहे.
हमीभावाची आकडेवारी
माेदींनी आकडेवारीचा दाखला देताना सांगितले, स्वामीनाथ आयाेगाच्या शिफारसीनुसार उत्पादन मूल्याच्या दीड पट हमीभाव देत असल्याचेही माेदी म्हणाले. देश रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांना माेदींनी नमन केले. यावेळी माेदींनी ‘व्हाेकल फाॅर लाेकल’चाही नारा दिला.