वाराणसीत मोदींविरोधात प्रियंका गांधी लढणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 04:58 AM2019-04-15T04:58:44+5:302019-04-15T04:59:20+5:30
पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी देण्याबाबत कॉँग्रेस पक्षामध्ये गंभीरपणे विचार चालू आहे.
शीलेश शर्मा
नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी देण्याबाबत कॉँग्रेस पक्षामध्ये गंभीरपणे विचार चालू आहे. त्याचबरोबर मोदी यांना टक्कर देऊ शकेल अशा अन्य नावांबाबतही चर्चा सुरू आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्याशी याबाबत चर्चा झाली आहे. विरोधी पक्षांच्या संयुक्त उमेदवार म्हणून या नावाला संमती मिळविण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.
सूत्रांनी सांगितले की, कॉँग्रेसने चार पथके अभ्यासासाठी वाराणसीत गेली आहेत. मात्र कॉँग्रेसकडून उमेदवारीच्या घोषणेबाबत कमालीची गुप्तता बाळगली आहे. त्याचप्रमाणे अन्य सक्षम पर्यायांचा विचार सुरू आहे. त्यात सिनेजगतातील काहींचा समावेश आहे.
ही जागा सपा-बसपा युतीमध्ये समाजवादी पार्टीच्या वाट्याला आली आहे. सपाचे अखिलेश यादव यांच्याशी प्रियांका यांचे चांगले संबंध आहेत. ते या उमेदवारीबाबत सकारात्मक आहेत. उत्तरप्रदेशात कॉंग्रेसने मुलायम परिवारातील सदस्यांविरोधात उमेदवार दिले नाहीत. त्यामुळे अखिलेश ही जागा कॉँग्रेससाठी जागा सोडू शकतात.
संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी या बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांच्याशी संपर्क साधून आहेत. त्या मायावती यांना प्रियांका यांच्या प्रचारासाठी तयार करू शकतात.
वेगळे निकाल शक्य
या मतदारसंघात रोहनिया, वाराणसी (उत्तर), वाराणसी (दक्षिण), सेवापुरी आणि बनारस कॅण्टॉनमेंट हे पाच विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत. २०१४च्या निवडणुकीमध्ये इथे मोदी यांना ५६.३६ टक्के मते मिळाली होती. तर कॉँग्रेस-सपा आघाडीला ७.३३ टक्के, बसपाला ५.८७ टक्के तर आम आदमी पार्टीला २०.२९ टक्के मते मिळाली होती. यंदा कोणतीही लाट नसल्याने कॉँग्रेस उमेदवाराला सर्व विरोधकांचा पाठिंबा मिळाल्यास वेगळे चित्र दिसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.