प्रियंका गांधी, ज्योतिरादित्य सिंधिया यांना करावा लागेल कठोर आव्हानांचा सामना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 06:11 AM2019-01-25T06:11:01+5:302019-01-25T06:11:11+5:30
प्रियंका गांधी-वाड्रा यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली.
- हरिश गुप्ता
नवी दिल्ली : प्रियंका गांधी-वाड्रा यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली. लोकसभा निवडणुकीआधी त्यांच्यावर पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारीही सोपवण्यात आली. तर ज्योतिरादित्य पश्चिम उत्तरप्रदेशची आघाडी सांभाळणार आहेत; परंतु या दोघांसाठीही पुढची वाटचाल वाटते तितकी सोपी असणार नाही. अनेक कठोर आव्हानांचा त्यांना सामना करावा लागणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रियंका सध्या अमेरिकेत आहेत. जवळच्या व्यक्तीच्या आरोग्य तपासण्यांसाठी कुटुंबातील सदस्यांसह त्या तीन आठवड्यांपूर्वीच अमेरिकेला गेल्या आहेत. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात परतल्यावर त्या दिलेल्या जबाबदारीवर काम सुरु करतील.
उत्तर प्रदेशच्या आघाडीवर त्यांचा प्रवास तितका सोपा-सरळ नसेल. त्यांना असे ३३ लोकसभा मतदारसंघ सोपवले आहे जिथे २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसला भोपळाही फोडता आला नव्हता. राहुल गांधी यांनी अत्यंत विचारपूर्वकपणे ही राजकीय चाल खेळली आहे.
प्रियंका आणि ज्योतिरादित्य यांना एकेका मतासाठी झगडावे लागणार आहे. आता काँग्रेसने सर्व लक्ष बाराबांकी (दुसरे स्थान), कुशीनगर (दुसरे), मिर्झापूर (तिसरे), प्रतापगढ (तिसरे) आणि वाराणसी (तिसरे) या मतदारसंघावर केंद्रीत करण्याचे ठरवले आहे. वाराणसीमध्ये सर्व विरोधी पक्षांनी मिळून भाजपाचे बंडखोर शत्रुघ्न सिन्हा यांना उमेदवारी देण्यासाठी चर्चा सुरु आहेत.
तसेच सहारणपूर, गाझियाबाद (राज बब्बर यांनी लढवलेली), लखनौ (रितू बहुगुणा जोशी ज्या पराभवानंतर भाजपावासी झाल्या), कानपूर (श्रीप्रकाश जयस्वाल) आणि खेरी या मतदारसंघावर लक्ष देणार आहे जिथे काँग्रेस दुसऱ्या स्थानी होती. येथेही प्रियंका व ज्योतिरादित्य या दोघांना प्रचंड संघर्ष करावा लागणार आहे.