प्रियंका गांधी यांच्या एंट्रीमध्ये भाजपा शोधतेय स्वत:चा फायदा?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 05:43 AM2019-01-24T05:43:12+5:302019-01-24T05:43:45+5:30
प्रियंका गांधी-वाड्रा राजकीय मैदानात उतरल्याचा मोठा फायदा काँग्रेसला होईल, असा दावा केला जात असतानाच भाजपाही उत्तर प्रदेशात याचा फायदा कसा घेता येईल, याची रणनीती तयार करत असल्याचे समजते.
संतोष ठाकुर
नवी दिल्ली : प्रियंका गांधी-वाड्रा राजकीय मैदानात उतरल्याचा मोठा फायदा काँग्रेसला होईल, असा दावा केला जात असतानाच भाजपाही उत्तर प्रदेशात याचा फायदा कसा घेता येईल, याची रणनीती तयार करत असल्याचे समजते. प्रियंका गांधी-वाड्रा प्रचारात मुस्लीम, दलित आणि ब्राह्मण यांच्या मुद्द्यांवर अधिक भर देतील. त्याचा फटका सपा आणि बसपला होईल, अशी भाजपाच्या गोटात चर्चा आहे. त्यामुळे मतांचे विभाजन होऊन अंतिम फायदा भाजपालाच होईल, असा तर्क लावला जात आहे.
भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, प्रियंका यांच्या एंट्रीमुळे ब्राह्मण-राजपूतांच्या २ टक्के मतांचा काँग्रेसला लाभ होऊ शकतो. तसेच एकूण मुस्लीम मतांपैकी जवळपास ९ ते १० टक्के मते काँग्रेसकडे खेचली जाऊ शकतात. ही सपा-बसपा, रालोदची व्होटबँक आहे. त्यामुळे सहाजिकच या तिन्ही पक्षांना फटका बसेल व भाजपाला मतविभाजनाचा फायदा होईल. प्रियंका यांच्याकडे पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी आहे. ज्या भागात त्या आपला प्रभाव दाखवतील, त्या भागात मतांचे विभाजन होईल, असा दावा या नेत्याने केला.
प्रियंका यांचीच मागणी वाढेल
भाजपाच्या अन्य एका नेत्याच्या म्हणण्यानुसार, प्रियंका यांचा प्रभाव बघून काँग्रेसमध्ये त्यांच्याच सभांची अधिक मागणी होईल. मात्र आता ही निवडणूक हेही दाखवून देईल की २०२४मध्ये काँग्रेसकडून पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल? काँग्रेसमध्ये राहुल आणि प्रियंका यांच्यापैकी लोकप्रिय कोण आहे, हेही बघायला मिळेल.
>प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनीही पत्नी प्रियंकाचे अभिनंदन केले आहे. या आयुष्याच्या नवीन टप्प्यावर मी कायम तुझ्या सोबत असेन, अशी पोस्ट रॉबर्ट वाड्रा यांनी फेसबुकवर टाकली आहे.