पुरोगामी महाराष्ट्र सरकार आता प्रतिगामी व्हायला लागले आहे - प्रकाश आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 07:17 PM2020-10-15T19:17:56+5:302020-10-15T19:19:25+5:30
Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटद्वारे महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे.
पाटणा : पुरोगामी असलेले महाराष्ट्र सरकार हे आता प्रतिगामी व्हायला लागले आहे. कोरोनाच्या काळात लॉकडाऊन उठविताना केंद्राने काही गाइडलाइन दिल्या, त्यादेखील मान्य करायला महाराष्ट्र सरकार तयार नाही. त्यामुळे राज्याची आर्थिक स्थिती इतर राज्यांच्या तुलनेत बिकट होत चालली असून महाराष्ट्र सरकारने बेभरवशावर न राहता निर्णय घेणारे राज्य म्हणून पुन्हा लौकिक मिळवावा, असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटद्वारे महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. ट्विटरवर त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ते म्हणाले, "महाराष्ट्र शासन हे पुरोगामी शासन, आता ते हळूहळू प्रतिगामी व्हायला लागले आहे. कोरोना लॉकडाऊन उठवतांना केंद्राने अनेक गाइडलाइन्स दिल्या, परंतु महाराष्ट्र शासन त्यांना मान्य करायलाच तयार नाही. आरोग्य सेतूचे अॅप आले, त्यातून लोकांची तब्येत कशी आहे हे कळते. कोरोनाबाधित आहे की नाही हे कळते. परंतु महाराष्ट्र शासनाने अजुनही लॉकडाउन उठवला नाही, अशी परिस्थिती आहे. कदाचित या व्हिडिओनंतर उठवतील अशी परिस्थिती आहे."
महाराष्ट्र शासन पुरोगामीत्व आणि निर्णय क्षमतेसाठी ओळखलं जातं, पण ते हळूहळू प्रतिगामी होताना दिसतंय. केंद्राने लॉकडाउन उठवण्यासाठी दिलेल्या गाईडलाईन्स महाराष्ट्र शासन मान्य करायला तयार नाही. ज्याप्रकारे इतर राज्यांनी मंदिरं आणि आर्थिक केंद्र चालू करून अर्थव्यवस्थेला गती दिली, pic.twitter.com/vFYsK8kaHi
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) October 15, 2020
दरम्यान, प्रकाश आंबेडकर हे सध्या निवडणुकीच्या निमित्ताने बिहारमध्ये असून त्यांनी अनेक राज्यांचा दौरा केल्यावर त्यांच्या असे लक्षात आले की लॉकडाऊन नंतर इतर राज्यांची आर्थिक परिस्थिती महाराष्ट्रापेक्षाही चांगली आहे. इतर राज्यांनी लॉकडाऊन उठविताना केंद्राच्या गाइडलाइन्सचा आधार घेतला होता. मात्र, महाराष्ट्र सरकार केंद्राची गाइडलाइन्स मान्य करायला तयार नाही. शिवाय, महाराष्ट्र सरकारने अद्यापही लॉकडाउन उठविला नाही. राज्यातील मंदिर बंद असल्याने स्थानिक लोकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे बेभरवशावर न राहता पुरोगामित्व निर्णय घेणारे राज्य उभे करावे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.