जयंत पाटील यांचा मोबाईल हॅक करून अपप्रचार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 04:47 AM2019-04-23T04:47:35+5:302019-04-23T04:48:32+5:30
संगणक प्रणालीचा गैरवापर करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांचा मोबाईल क्रमांक हॅक करून त्यावरून सांगली लोकसभा मतदारसंघात अपप्रचार केल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला आहे.
इस्लामपूर (जि.सांगली) : संगणक प्रणालीचा गैरवापर करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांचा मोबाईल क्रमांक हॅक करून त्यावरून सांगली लोकसभा मतदारसंघात अपप्रचार केल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला आहे. याबाबत जयंत पाटील यांनी सोमवारी रात्री इस्लामपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. कार्यकर्ते व मतदारांनी या अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांचा मोबाईल क्रमांक ९८२१२२२२२८ हा हॅक करून ‘आपणास विरोधी उमेदवारास मदत करायची आहे’, असा खोटा संदेश पसरविण्यात आला आहे. सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. याबाबत माहिती मिळताच जयंत पाटील यांनी माजी सभापती दत्ताजी नीलकंठ पाटील (रा. आगळगाव, ता. कवठेमहांकाळ) यांच्याशी संपर्क साधला असता, अशा प्रकारचे फोन या मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांना आल्याचे निदर्शनास आले. इस्लामपूर पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधी गुन्हा दाखल केला आहे.
फेक कॉलर अॅपवरून माझा मोबाईल क्रमांक हॅक करून अज्ञातांनी हा खोडसाळपणा केला आहे. मी या खोडसाळपणाचा निषेध करतो. कार्यकर्ते व मतदारांनी त्यावर विश्वास ठेवू नये. - जयंत पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष