आंदोलन बनले आखाडा : खासदार बारणे आणि आमदार जगताप यांच्यावर शिव्यांची लाखोली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 09:26 PM2019-02-11T21:26:16+5:302019-02-11T21:29:03+5:30
महापालिकेसमोर सुरू असलेल्या आंदोलनात छावा संघटनेच्या अध्यक्षांनी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे आणि भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर शिव्यांची लाखोली वाहिली
पिंपरी : महापालिकेसमोर सुरू असलेल्या आंदोलनात छावा संघटनेच्या अध्यक्षांनी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे आणि भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर शिव्यांची लाखोली वाहिली. यावेळी शिवसैनिक आक्रमक झाले. छावा संघटनेचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आंदोलनाचा फज्जा उडाला असून मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांना दिलगिरी व्यक्त करावी लागली.
अनधिकृत बांधकामे, शास्ती कर, संतपीठ गैरवहार, भोसरी रुग्णालयाचे खासगीकरण आणि पीएमपीएमएल बस खरेदीच्या विरोधात राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे आणि विविध सामाजिक संस्था, संघटनांच्या वतीने आंदोलन होते. त्यावेळि छावा संघटनेचे अध्यक्ष धनाजी येळेकर यांनी भाजप बरोबर सत्तेत असलेले शिवसेना खासदार श्रीरंग बारणे आणि चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर शिव्यांची लाखोली वाहिली. त्यामुळे आंदोलनात सहभागी शिवसैनिक खवऴले. खासदारांचे नाव का घेतले, असा जाब विचारला.
शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर आणि संपर्क प्रमुख युवराज दाखले यांनी खासदार बारणे यांचे नाव घेतल्याने राडा घातला. आंदोलन नागरिकांच्या प्रश्नांसाठी असून खासदारांचे नाव घेण्यास त्यांनी विरोध दर्षविला होता. तेवढ्यात घर बचाव संघर्ष समितीच्या महिलांनी खासदार बारणे आणि आमदार जगताप यांच्या विरोधात घोषणा दिल्या. आमची घरे पाडण्यात हेच खासदार, आमदार जबाबदार आहेत. त्यामुळे आम्ही त्यांचे नाव आंदोलनात घेणारच, असा पवित्रा घेतला. तेवढ्यात राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, गटनेते राहूल कलाटे, विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी मध्यस्ती करत संतप्त महिला कार्यकर्त्या आणि छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना शांत होण्याचा इशारा केला.