तुम्ही ‘योगी’ असल्याचे २४ तासांत सिद्ध करा, ओवेसींचे आदित्यनाथांना आव्हान
By बाळकृष्ण परब | Published: October 22, 2020 03:16 PM2020-10-22T15:16:01+5:302020-10-22T15:18:42+5:30
Yogi Adityanath News : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यात वाकयुद्ध रंगले आहे.
लखनौ - बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार रंगात आला असतानाच आरोप-प्रत्यारोपांनाही जोर आला आहे. त्याचदरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यात वाकयुद्ध रंगले आहे. काल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जमुई मतदारसंघात एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसींवर टीका केली होती. ओवेसी आणि राहुल गांधी पाकिस्तानची प्रशंसा करतात, असा आरोप योगींनी केला होता. आता ओवेसींनी त्याला प्रत्युत्तर देत योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार प्रतिहल्ला केला आहे.
योगींना प्रत्युत्तर देताना ओवेसी म्हणाले की, मी योगी आदित्यनाथ यांना आव्हान देतो की, त्यांनी २४ तासांत ते खरे योगी असल्याचे पुनावे द्यावेत. त्यांनी वैफल्यग्रस्ततेतून माझ्यावर आरोप केले आहे. मी पाकिस्तानमध्ये गेलो होतो आणि तिथे मी भारतीय लोकशाहीवर बोललो होतो हे त्यांना माहीत नाही का, असा सवाल ओवेसींनी विचारला.
योगी आदित्यनाथ यांनी जमुई येथील भाजपा उमेदवार श्रेयसी सिंह यांच्यासाठी प्रचारसभा घेतली होती. त्यावेळी मतदारांना संबोधित करताना योगी म्हणाले होते की, राहुल गांधी आणि ओवेसी हे पाकिस्तानचे कौतुक करत आहेत. तुम्ही या दोघांकडून देशहिताची कल्पना करू शकता का. हे दोघे देशाचं हित साधणार का. देशाचा शत्रू असलेला देश जो भारतामध्ये दहशतवादी कारवाया करतोय. अशा देशाच्या हिताची गोष्ट करणाऱ्याकडून काय अपेक्षा ठेवता येईल? तसेच काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर राहुल गांधी आणि ओवेसी यांना त्रास झाला, असाही दावा योगी आदित्यनाथ यांनी केला होता.