फुटिरवादी राजकारण हाणून पाडा- प्रियांका गांधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 04:02 IST2019-04-25T04:01:36+5:302019-04-25T04:02:12+5:30
खोटारड्या व्यक्तीला मते देऊ नका; सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून मतदान करा

फुटिरवादी राजकारण हाणून पाडा- प्रियांका गांधी
फतेहपूर : नकारात्मक तसेच फूट पाडणाऱ्या राजकारणाला हद्दपार करा. जो व्यक्ती खोटारडेपणा करतो, जनतेची कामे करत नाही त्याला मते देऊ नका, असे आवाहन काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मतदारांना बुधवारी केले. मात्र त्यांनी यासंदर्भात भाजप वा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घ्यायचे टाळले.
प्रचारसभेत प्रियांका गांधी म्हणाल्या की, सध्या गंभीर परिस्थितीतून जात असलेला आपल्या देशाला वाचविण्यासाठी तसेच भावी पिढ्यांचा विचार करून मतदारांनी भेदभाव करणाºया प्रवृत्तींना, त्यांच्या राजकारणाला अजिबात थारा देऊ नये. फुटिरवादी राजकारण हाणून पाडायला हवे. जनतेच्या समस्या समजून घेणाºया, त्या सोडविण्याची धडपड करणाऱ्यांनाच पाठिंबा द्या. लोकशाहीमध्ये जनशक्ती सर्वात महत्त्वाची आहे.
मतदानाचा अधिकार हे आपले मोठे सामर्थ्य आहे. ते त्याच्या हातातील ते मोठे शस्त्रही आहे. सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून प्रत्येकाने या हक्काचा उपयोग करायला हवा, असे प्रियांका गांधी प्रचारसभे म्हणाल्या. प्रियांका गांधी यांच्या राजकीय हालचाली व भाषणांकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. पक्षाने आदेश दिल्यास वाराणसीतून लोकसभा निवडणूक लढवेन असे प्रियांका गांधी यांनी सांगितल्याने त्याबाबतची उत्सुकताही ताणली गेली आहे. मोदींविरोधात प्रियांका गांधी यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी काँग्रेस नेते, कार्यकर्ते सातत्याने करत असतात. (वृत्तसंस्था)
हे खपवून घेऊ नका
देशात गेर्लं पाच वर्षे फुटिरवादी राजकारणाला बळ देण्याचे काम सुरू आहे. सामान्य जनतेत जात, धर्म, पंथ, भाषा याआधारे फूट पाडण्याचे प्रयत्न जनतेने खपवून घेता कामा नयेत.
कोणी काय खावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण त्यातही सरकार व पक्ष हस्तक्षेप करू पाहत आहेत. विविधतेतील एकता पुसण्याचा हा डाव फार काळ चालणार नाही.