शिवसेनेच्या गुंडशाहीविरोधात लढणाऱ्या भाजपच्या दोन कार्यकर्त्यांचा जाहीर सन्मान, कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 04:34 PM2021-08-25T16:34:03+5:302021-08-25T16:35:23+5:30
Kalyan News: शिवसेनेच्या आमदारांनी व ज्येष्ठ नेते पदि असलेल्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांसमवेत एकत्र येऊन ज्या पद्धतीने मंगळवारी कल्याण पश्चिम येथील भाजप पक्ष कार्यालयावर हल्ला केला, त्याचा कल्याण भाजपच्या वतीने बुधवारी पक्षाच्या जिल्हा कार्यालयात एकत्र येऊन त्याचा जाहीर निषेध करण्यात आला.
डोंबिवली - शिवसेनेच्या आमदारांनी व ज्येष्ठ नेते पदि असलेल्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांसमवेत एकत्र येऊन ज्या पद्धतीने मंगळवारी कल्याण पश्चिम येथील भाजप पक्ष कार्यालयावर हल्ला केला, त्याचा कल्याण भाजपच्या वतीने बुधवारी पक्षाच्या जिल्हा कार्यालयात एकत्र येऊन त्याचा जाहीर निषेध करण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी सांगितले. तसेच त्या झुंड, गुंडशाहीच्या विरोधात लढणाऱ्या भाजपच्या दोन निष्ठावान कार्यकर्त्यांचा सन्मानही आमदार गणपत गायकवाड यांच्याहस्ते बुधवारी करण्यात आला.
कार्यकर्ते प्रताप टूमकर व वैभव सावंत या दोन लढवय्या कार्यकर्त्यांनी पक्ष निष्ठा दाखवून भाजपचा कार्यकर्ता कसा असतो हे दाखवून दिले. पक्षाच्या कल्याण पश्चिमच्या पक्ष कार्यालयावर आमदार विश्वनाथ भोईर व शिवसेनेचे नेते बंड्या साळवी व त्यांचे सहकारी अशा पंचवीस लोकांनी एकत्र येऊन दगडफेक केली, काचा फोडल्या. त्यावेळी घटनास्थळी पक्षनिष्ठा जोपासून तिथे उपस्थित असणारे प्रताप व वैभव दोनच कार्यकर्ते निडरपणे थांबले, त्यांनी त्यांच्यापरीने प्रतिकार केला. पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित असताना आमदार भोईर यांनी त्यांच्या समर्थकांसमवेत यावं आणि दहशत करावी हे लोकशाहीला मारक आहे. सर्वसामान्य स्तरातून याचा खूप मोठ्या प्रमाणात निषेध होतोय असे प्रतीपादन कांबळे यांनी केले.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याना देशाचे स्वातंत्र्य वर्ष कितवे असावे हे माहीत नसणं खूप मोठं दुर्दैव आहे, अतिशय खेदजनक बाब आहे असे कांबळे म्हणाले. आणि त्यावर जाहीरपणे फक्त प्रतीप्रश्न विचारला म्हणून केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ राजकीय नेते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना सूडबुद्धीने अटक करणं हे कोणत्या लोकशाहीला धरून आहे आणि या घटनेवरून पूर्ण महाराष्ट्राला वेठीस धरणे , तोडफोड करणे मारहाण करणे या गोष्टीचा आम्ही जाहीरपणे निषेध करीत असल्याचे त्यांनी समाजमाध्यमांद्वारे स्पष्ट केले. मंगळवारी त्या घडलेल्या घटनांचा स्थानिक कार्यकर्त्याना त्रास का? असा सवाल करत त्या सगळ्याचा निषेध करण्यासाठी आणि पक्ष कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी कांबळे, आमदार गायकवाड, शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, डोंबिवली ग्रामीण अध्यक्ष नंदू परब, संजय मोरे, जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा रेखा चौधरी, नाना सूर्यवंशी, स्वप्निल काटे, मिहिर देसाई अनेक कार्यकर्ते पदाधिकारी एकत्र आले होते.