मित्रपक्षाची समजूत काढण्यात भाजपाला यश; पुणे पदवीधर निवडणुकीतील टेन्शन दूर

By प्रविण मरगळे | Published: November 17, 2020 01:28 PM2020-11-17T13:28:49+5:302020-11-17T13:31:54+5:30

Pune Graduate Constituency BJP News: घरात भांडणं होत असतात म्हणून नाराज व्हायचं नसतं असं सांगत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सदाभाऊ खोत यांची समजूत काढली.

Pune graduate constituency: BJP success in reaching an understanding with Sadabhau Khot | मित्रपक्षाची समजूत काढण्यात भाजपाला यश; पुणे पदवीधर निवडणुकीतील टेन्शन दूर

मित्रपक्षाची समजूत काढण्यात भाजपाला यश; पुणे पदवीधर निवडणुकीतील टेन्शन दूर

Next
ठळक मुद्देपुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपाला रयत क्रांती संघटनेची समजूत काढण्यात यश पुणे पदवीधर मतदारसंघातून गेल्यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील निवडून आले होते रयत क्रांती संघटनेचा योग्य तो सन्मान राखला जाईल, दोन वेगवेगळ्या संघटना असल्याने विचार वेगळे असतात

पुणे – विधान परिषदेच्या ५ जागांवर येत्या १ डिसेंबरला निवडणुका होणार आहेत, यात पुणे पदवीधर निवडणुकीत भाजपाकडून सांगलीच्या संग्राम देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र या निवडणुकीत रयत क्रांती संघटनेने उमेदवार उभा केल्याने भाजपाची डोकेदुखी वाढली होती. परंतु भाजपाला मित्रपक्ष असलेल्या रयत क्रांती संघटनेची समजूत काढण्यात यश आलं आहे.

याबाबत रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत म्हणाले की, भाजपाचे घटकपक्ष म्हणून आम्ही भाजपासोबत आहोत, आम्ही समाधानी आहोत, निश्चित यापुढेही भाजपासोबत चांगले काम करू, पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराला फायदा होईल असं कृत्य रयत क्रांती संघटना करणार नाही. त्यामुळे रयत क्रांती संघटनेचे उमेदवार प्रा. एन. डी चौगुले यांनी पुण्यातून अर्ज मागे घेतल्याचं त्यांनी सांगितले.

दरम्यान, रयत क्रांती संघटनेचा योग्य तो सन्मान राखला जाईल, दोन वेगवेगळ्या संघटना असल्याने विचार वेगळे असतात. प्रत्येकाला आपली संघटना वाढवण्याचा अधिकार आहे. मात्र ही निवडणूक महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांविरोधात लढायची आहे. त्यामुळे भाजपाचा उमेदवार मागे घेण्याचा प्रश्न नव्हता. घरात भांडणं होत असतात म्हणून नाराज व्हायचं नसतं असं सांगत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सदाभाऊ खोत यांची समजूत काढली.

पुणे पदवीधर मतदारसंघातून गेल्यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील निवडून आले होते, पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून खासदार श्रीनिवास पाटील यांचे चिरंजीव सारंग पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती, मात्र तेव्हाच्या निवडणुकीत सांगलीच्या अरूण लाड यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. यानिवडणुकीत चंद्रकांत पाटील यांना ६२ हजारांच्या आसपास मतदान झाले होते, तर सारंग पाटील यांना ५९ हजारांच्या वर मतदान झाले, अवघ्या २ हजारांच्या फरकाने भाजपाने ही जागा राखली होती, यात विशेषत: अरूण लाड यांनी घेतलेली २५ हजारांहून अधिक मते लक्षणीय होती, त्यामुळे लाड यांच्या बंडखोरीचा फटका बसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे पदवीधर मतदारसंघात निसटता पराभव सहन करावा लागला होता.

दरम्यान, पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपाला रयत क्रांती संघटनेची समजूत काढण्यात यश आलं असलं तरीही औरंगाबाद पदवीधर उमेदवारीवरुन भाजपात नाराजी वाढली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपाच्या प्रदेश कार्यकारणीचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवला आहे.

भारतीय जनसंघापासून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात करणाऱ्या जयसिंगरावांनी मधल्या काळातही भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि नंतर शिवसेनेत प्रवेश केला होता. यानंतर ते पुन्हा घरवापसी करत भाजपमध्ये परतले होते. मात्र, त्यांनी आता पुन्हा एकदा भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे.

Web Title: Pune graduate constituency: BJP success in reaching an understanding with Sadabhau Khot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.