Pune Graduate Constituency: पुणे पदवीधर निवडणुकीत राष्ट्रवादीला पुन्हा बसणार बंडखोरीचा फटका?
By प्रविण मरगळे | Published: November 12, 2020 10:45 AM2020-11-12T10:45:47+5:302020-11-12T10:48:19+5:30
Pune Graduate Constituency, NCP Candidate News: उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत राष्ट्रवादी पुणे पदवीधर मतदारसंघात कोणाला उमेदवारी देणार याबाबत उत्सुकता होती, अखेर शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसने अरूण लाड यांना पुणे पदवीधर मतदारसंघातून अधिकृत उमेदवारी दिली आहे.
मुंबई – राज्यातील विधान परिषदेच्या ५ जागांसाठी येत्या १ डिसेंबरला निवडणूक होत आहे. यातच यंदा महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यात थेट लढत होणार आहे. पुणे शिक्षक मतदारसंघ, पुणे पदवीधर, नागपूर पदवीधर, अमरावती शिक्षक, औरंगाबाद पदवीधर अशा ५ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यात नागपूर पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघ ही निवडणूक काँग्रेस लढणार आहे तर औरंगाबाद आणि पुणे पदवीधर निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे.
उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत राष्ट्रवादी पुणे पदवीधर मतदारसंघात कोणाला उमेदवारी देणार याबाबत उत्सुकता होती, अखेर शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसने अरूण लाड यांना पुणे पदवीधर मतदारसंघातून अधिकृत उमेदवारी दिली आहे. तत्पूर्वी पुणे पदवीधर मतदारसंघातून कोल्हापूरमधून राष्ट्रवादीचे भैय्या माने यांनी ११ तारखेला उमेदवारी अर्ज भरला आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे जवळचे समर्थक भैय्या माने यांच्यासोबत अर्ज भरताना राष्ट्रवादीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्षही उपस्थित होते. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १७ नोव्हेंबर आहे, त्यामुळे भैय्या माने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतात का? हे पाहणं गरजेचे आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघातून गेल्यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील निवडून आले होते, पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून खासदार श्रीनिवास पाटील यांचे चिरंजीव सारंग पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती, मात्र तेव्हाच्या निवडणुकीत सांगलीच्या अरूण लाड यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. यानिवडणुकीत चंद्रकांत पाटील यांना ६२ हजारांच्या आसपास मतदान झाले होते, तर सारंग पाटील यांना ५९ हजारांच्या वर मतदान झाले, अवघ्या २ हजारांच्या फरकाने भाजपाने ही जागा राखली होती, यात विशेषत: अरूण लाड यांनी घेतलेली २५ हजारांहून अधिक मते लक्षणीय होती, त्यामुळे लाड यांच्या बंडखोरीचा फटका बसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे पदवीधर मतदारसंघात निसटता पराभव सहन करावा लागला होता.
पुणे पदवीधर मतदारसंघात कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि पुणे जिल्ह्याचा समावेश होतो. राष्ट्रवादीकडून या मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील, मोहोळचे बाळराजे पाटील, श्रीमंत कोकाटे आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैय्या माने इच्छुक होते, यापैकी भैय्या माने यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. गेल्या ३० वर्षांत पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपाचे वर्चस्व राहिले आहे. २००२ ला जनता दलाचे प्रा. शरद पाटील यांचा अपवाद वगळता २४ वर्षे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीच प्रतिनिधित्व केले. मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीत भाजपा व राष्ट्रवादीमध्ये निकराची झुंज झाली आणि चंद्रकांत पाटील यांनी बाजी मारली. यात अरूण लाड यांच्या बंडखोरीचा फटका पक्षाला बसला, मात्र या निवडणुकीत राष्ट्रवादीने लाड यांनाच उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादीतील नाराजी शांत होणार का? हा प्रश्न आहे. परंतु राष्ट्रवादीतील बंडखोरी रोखण्यास पक्षनेतृत्वाला यश आलं तर पुणे पदवीधर निवडणूक जिंकणं भाजपासाठी मोठं आव्हान असणार आहे.