पुण्याची प्रतिष्ठा कमी करणाऱ्या पालकमंत्री गिरीश बापटांनी राजीनामा द्यावा : राष्ट्रवादीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2019 07:54 PM2019-01-19T19:54:33+5:302019-01-19T19:58:56+5:30
पालकमंत्र्यांनी त्यांचा कार्यकाल कायम त्यांच्या चुकीच्या कामांमुळे चर्चेत ठेवला आहे आणि आता न्यायालयाने त्यांच्यावर ठपका ठेवला आहे याची लाज बाळगुन अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी केली.
पुणे : अन्नपुरवठा मंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांनी आपल्या मंत्री पदाचा गैरवापर करुन कर्तव्यात कसुर केल्याप्रकरणी न्यायालयाने त्यांच्यावर ठपका ठेवला आहे.या सर्व प्रकारणातील दोषी गिरीष बापट यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी व त्यांच्या या कृत्याचा निषेध करण्यासाठी पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने शहराध्यक्ष चेतन तुपे यांच्या नेतृत्वाखाली लोकमान्य टिळक पुतळा, महात्मा फुले मंडई येथे आंदोलन करण्यात आले.
यावेळी नगरसेवक वनराज आंदेकर , अशोक कांबळे, युवक अध्यक्ष राकेश कामठे, सामजिक न्याय विभागाचे अध्यक्ष विजय डाकले,ओ.बी.सी विभागाचे अध्यक्ष संतोष नांगरे, अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष इक्बाल शेख पक्षाचे सर्व पदाधिकारी वा कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रवक्ते अंकुश काकडे म्हणाले की पुणे शहराचे नाव खाली घालवण्याचे काम पालकमंत्र्यानी केले आहे तुरडाळ घोटाळा, रेशन घोटाळा, आणि आता तर कोर्टाने त्यांच्या कार्यपध्दतीवरच ठपका ठेवला आहे यासर्व गोष्टींची जबाबदारी स्विकारुन पालकमंत्री गिरीष बापट यांनी राजीनामा द्यावा.
मुख्यमंत्री पारदर्शक कारभाराचा आव आणतात आणि त्यांचे मंत्रीमंडळातील मंत्र्यावर न्यायलय कर्तव्यात कसुर केल्याचा ठपका ठेवत आहे हा कसला पारदर्शक कारभार , मुख्यमंत्र्यानी त्यांच्या मंत्रीमंडळातील एका जेष्ठ मंत्र्यावर न्यायालयाने ठपका ठेवला म्हणून त्यांचा राजीनामा घेतात आता मुख्यमंत्री अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांचा राजीनामा घेणार का ? पालकमंत्र्यांनी त्यांचा कार्यकाल कायम त्यांच्या चुकीच्या कामांमुळे चर्चेत ठेवला आहे आणि आता न्यायालयाने त्यांच्यावर ठपका ठेवला आहे याची लाज बाळगुन अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी केली.