पुणेरी मिसळ : ...निवडणुकीनंतर सारं विसरून जा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 15:28 IST2019-04-26T15:27:56+5:302019-04-26T15:28:40+5:30
२९ एप्रिलला निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यानंतर महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक संपणार आहे.

पुणेरी मिसळ : ...निवडणुकीनंतर सारं विसरून जा
- अभय नरहर जोशी -
इतके दिवस सभा, रॅली, दावे-प्रतिदावे, गाठी-भेटी, भाषणे, आश्वासने अशी धामधूम संपून या पातळीवर सारं कसं शांत होणार आहे. यासाठी लागणारी कार्यकर्त्यांची गरज काही काळ तरी संपणार आहे...त्यांची ही कथा आणि व्यथा...
'' बेरोजगारीचा प्रश्न कायम
भविष्यातला अंधार कायम
नेते आमचे ‘कार्यसम्राट’
ते दाखवतील आपल्याला वाट
फ्लेक्स त्यांचा उभारून जा
...निवडणुकीनंतर सारं विसरून जा - १
दुष्काळ आवडतो सर्वांना
तशी निवडणूक आवडे सर्वांना
प्रत्येकाचे आपापले ‘दुकान’
नेत्याच्या दरबारी एजंटांना मान
निष्ठावंतांनो, सतरंज्या अंथरून जा
...निवडणुकीनंतर सारं विसरून जा - २
औट घटकेचा तू असतोस राजा
नंतर मिळते गुलामीची सजा
हुकमाचे एक्के वेगळेच असतात
निवडणुकीपुरतेच ते चमकतात
तू फक्त पत्ते तेवढे पिसून जा
...निवडणुकीनंतर सारं विसरून जा - ३
नेत्यांची मुलंच होतात नेते
कार्यकर्त्यांची मुलं कार्यकर्ते
रात्रंदिन राबून गाळतात घाम
गळ्यात उपरण्याचा लगाम
‘जिंदाबाद’च्या घोषणा देऊन जा
...निवडणुकीनंतर सारं विसरून जा - ४
झोपडी फाटली, चूल थंड
तरी करू नकोस तू बंड
‘त्यांना’ विजयश्रीच्या माळा
त्यासाठी आपली घरे जाळा
पण नेत्यांना सोन्यानं मढवून जा
...निवडणुकीनंतर सारं विसरून जा - ५
भाषणांतील शब्दांचा खेळ
कसा बसवायचा त्याचा मेळ
आश्वासनांचे पोकळ वारे
दाखवती चंद्र-सूर्य-तारे
मोहक स्वप्नांना या भुलून जा
...निवडणुकीनंतर सारं विसरून जा - ६
गेला सुखद घोषणांचा सुकाळ
आता भवताली फक्त दुष्काळ
वणवण थेंब थेंब पाण्यासाठी
फक्त कणकण जगण्यासाठी
वारंवार असाच कोमेजून जा
...निवडणुकीनंतर सारं विसरून जा - ७