राधाकृष्ण विखेंच्या राजकारणासाठी ससाणेंचा बळी?
By सुधीर लंके | Published: April 26, 2019 03:58 AM2019-04-26T03:58:59+5:302019-04-26T04:00:01+5:30
शिर्डी मतदारसंघात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी एकप्रकारे काँग्रेसविरोधातच बंड पुकारले आहे. काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांनी गुरूवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला
सुधीर लंके
अहमदनगर: शिर्डी मतदारसंघात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी एकप्रकारे काँग्रेसविरोधातच बंड पुकारले आहे. काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांनी गुरूवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. विखेंच्या आग्रहामुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जाते. नगर जिल्ह्यात काँग्रेसची सर्व संघटना माझ्या पाठिशी आहे हे दाखविण्याचा विखे यांचा प्रयत्न सुरु आहे.
पुत्र सुजय यांनी भाजपात प्रवेश केल्यापासून राधाकृष्ण विखे हे काँग्रेसपासून फटकून आहेत. त्यांनी पक्षासाठी एकही प्रचारसभा जिल्ह्यात व राज्यातही घेतली नाही. नगरचे काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार हे विखे यांचे समर्थक होते. ते भाजपला मदत करतील हा संशय असल्याने त्यांना पदमुक्त करुन पक्षाने करण ससाणे यांना जिल्हाध्यक्ष केले होते. ससाणे हे दिवंगत माजी आमदार व शिर्डी संस्थानचे माजी अध्यक्ष जयंत ससाणे यांचे पुत्र आहेत. पद जाताच शेलार हे अपेक्षेप्रमाणे भाजपच्या प्रचारात सक्रिय झाले. स्वत: राधाकृष्ण विखे यांनीही नगर मतदारसंघात भाजपच्या काही बैैठकांना उपस्थिती दर्शवली.
नगरचे मतदान संपल्यानंतर विखे आता शिर्डीत सक्रिय झाले आहेत. शिर्डीत भाऊसाहेब कांबळे हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यांच्यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात मोर्चेबांधणी करत आहेत. काँग्रेसने या मतदारसंघात वातावरणनिर्मितीही केली आहे. विखे या प्रचारापासून मात्र अलिप्त आहेत. उलट त्यांनी बुधवारी श्रीरामपूर येथे जयंत ससाणे यांच्या समर्थकांचा मेळावा घेतला. या मतदारसंघात कुणाचा प्रचार करायचा ही भूमिका गुरुवारी ठरवू अशी भूमिका त्यांनी या मेळाव्यात घेतली. मेळाव्याच्या दुसऱ्याच दिवशी करण ससाणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन प्रचारात तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. हे पाऊल त्यांनी विखे यांच्या सांगण्यावरुनच उचलल्याचे बोलले जाते. ससाणे यांची राजीनामा देण्याची इच्छा नव्हती. मात्र, त्यांनी हे पाऊल उचलावे अशी परिस्थिती निर्माण करण्यात आल्याचे समजते.
ससाणे यांनी जिल्हाध्यक्षपद स्वीकारुन तीन आठवडेच झाले होते. तीन आठवड्यातच त्यांचा असा राजकीय बळी गेला. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी शुक्रवारी शिर्डी मतदारसंघात प्रचारसभा घेत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही घडामोड घडल्याने याचे राजकीय पडसाद थेट दिल्लीत उमटतील अशी शक्यता आहे. विखे यांनी एकप्रकारे थेट काँग्रेस हायकमांडलाच इशारा दिला आहे. काँग्रेस या घटनेची काय दखल घेणार याची उत्सुकता आहे.
2009 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या बहुतांश नेत्यांनी शिर्डीत रामदास आठवले यांच्या विरोधात काम केले. मात्र, जयंत ससाणे यांनी प्रामाणिकपणे आठवले यांना साथ दिली होती. सेना-भाजपच्या विचारसरणीपासून ते दूर होते. भाऊसाहेब कांबळे यांना श्रीरामपुरातून आमदार म्हणून निवडून आणण्यात त्यांचीच महत्त्वाची भूमिका होती. आता त्यांच्या समर्थकांनी काँग्रेस संपविण्याचा विडा उचलला आहे. ससाणे यांचे समर्थक थेट सेनेच्या प्रचारात जाणार का? याची उत्सुकता आहे.