"सदस्यांना बोलण्याचा अधिकार नाही का?", राहुल यांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 06:21 PM2020-12-17T18:21:16+5:302020-12-17T18:23:43+5:30
देशाच्या सैन्याच्या गणवेशावर चर्चा करुन बैठकीत वेळ वाया गेला, असं विधान राहुल यांनी बैठकीतून बाहेर आल्यानंतर केलं होतं.
नवी दिल्ली
संरक्षण विषयक संसदीय समितीच्या बैठकीतून 'वॉक आउट' केलेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांना पत्र लिहिलं आहे. बैठकीत सदस्यांना बोलू दिलं जात नसल्याचं राहुल यांनी पत्रात नमूद केलं आहे. समितीतील प्रत्येक सदस्याला त्याचं मत मांडण्याचा अधिकार असायला हवा, असं राहुल यांनी म्हटलं आहे.
"संरक्षण विषयक संसदीय समितीचा सदस्य असल्यानं एखाद्या विषयावरील चर्चेत मुद्दा उपस्थित करण्याचा मला अधिकार आहे. पण बैठकीत बोलूच न देणं हे लोकशाहीच्या विरोधात असून अधिकारांवर गदा आणण्यासारखं आहे", असं राहुल यांनी पत्रात नमूद केलं आहे.
संरक्षण विषयक संसदीय समितीची बुधवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीतून राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या सदस्यांनी 'वॉक आउट' केले होते. बैठकीत समितीच्या अध्यक्षांनी राहुल यांना बोलूच दिलं नाही. त्यामुळे बैठकीतून निघून जाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नाही, असा आरोप काँग्रेसने केला आहे.
सैन्याचा गणवेश बदलण्याच्या निर्णयावर राहुल गांधी संतापले; बैठकीतून निघून गेले
देशाच्या सैन्याच्या गणवेशावर चर्चा करुन बैठकीत वेळ वाया गेला, असं विधान राहुल यांनी बैठकीतून बाहेर आल्यानंतर केलं होतं. सुत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीमध्ये तिन्ही सेना दलाचे प्रमुख बिपीन रावत सैन्याच्या गणवेशात बदल करण्याबाबतची माहिती देत होते. यावेळी राहुल यांनी हस्तक्षेप करत लडाखमध्ये काय परिस्थिती आहे? चीनविरोधात आपली काय रणनिती आहे? या प्रश्नांवर चर्चा व्हायला हवी असं म्हटलं. यावरुन बैठकीचे अध्यक्ष जुआल ओराम आणि राहुल यांच्या शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर राहुल यांनी बैठकीतून निघून जाण्याचा मार्ग स्वीकारला.