भाजपाचा मोठा निर्णय, 'या' राज्यात एकाही विद्यमान खासदाराला मिळणार नाही पुन्हा तिकीट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 09:26 AM2019-03-20T09:26:40+5:302019-03-20T09:27:27+5:30
भाजपानं छत्तीसगडमध्ये विद्यमान खासदारांना पुन्हा तिकीट न देण्याचं जवळपास निश्चित केलं आहे.
रायपूर- भाजपानंछत्तीसगडमध्ये विद्यमान खासदारांना पुन्हा तिकीट न देण्याचं जवळपास निश्चित केलं आहे. छत्तीसगडभाजपाचे प्रभारी आणि राष्ट्रीय महासचिव अनिल जैन म्हणाले, भाजपा लोकसभा निवडणूक 2019मध्ये विद्यमान 10 खासदारांना तिकीट नाकारून त्याऐवजी इतरांना संधी देणार आहे.
एएनआयच्या वृत्तानुसार, भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समिती(सीईसी)नंही विद्यमान खासदारांना बदलण्याच्या निर्णयाला मान्यता दिली आहे. गेल्या वर्षी झालेल्या छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भाजपाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. तसेच भाजपाला छत्तीसगडमधील सत्ताही गमवावी लागली होती. त्यामुळेच भाजपानं विद्यमान खासदारांना बदलण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशमध्येही मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपाच्या मुरली मनोहर जोशी यांचाही कानपूरमधून पत्ता कट केला जाऊ शकतो. त्याऐवजी उत्तर प्रदेश कॅबिनेटमध्ये मंत्री असलेल्या सतीश महाना यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. तसेच राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंह यांचा मुलगा राजवीर सिंह याला एटातून उमेदवारी मिळू शकते. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा वाराणसीतूनच निवडणूक लढणार आहेत. भाजपानं उत्तर प्रदेशमधल्या 24 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
या यादीमध्ये केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचं नाव असून, ते लखनऊमधून निवडणूक लढणार आहेत. तर स्मृती इरानी या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात अमेठीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. केंद्रीय मंत्री महेश शर्मा (गौतमबुद्ध नगर), हेमा मालिनी (मथुरा), रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा (गाझीपूर) आणि वीरेंद्र सिंह (भदोही) निवडणूक लढवणार आहेत. रमाशंकर कठेरिया(आग्रा), राघव लखनपाल(सहारनपूर), सत्यपाल सिंह(बागपत) आणि कीर्ति वर्धन सिंग(गोंडा) यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. कंवर सिंह तंवर(अमरोहा), महेंद्र नाथ पांडे(चंदोली), संतोष गंगवार(बरेली), विनोद सोनकर(कौशाम्बी) आणि कृष्ण राज (शाहजहांपूर) या निवडणुकीत नशीब आजमावणार आहेत.