राज यांच्याविरोधात भाजपामध्ये खलबते?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 05:31 AM2019-04-20T05:31:30+5:302019-04-20T05:31:47+5:30
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभा रोखण्यासाठी भाजपमध्ये हालचाली सुरू आहेत.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभा रोखण्यासाठी भाजपमध्ये हालचाली सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी अलीकडेच निष्णात वकिलांसोबत बैठक घेतली. राज यांच्या सभा कशा थांबवायच्या, त्यांच्यावर कोणते गुन्हे दाखल करता येतीत? याबाबत चर्चा झाल्याचा आरोप मनसे नेते अभिजित पानसे यांनी केला आहे. राज यांनी मनसे निवडणूक लढविणार नाही, असे जाहीर करत राज्यभर जाहीर सभांचा सपाटा लावला. या सभांमध्ये भाजपची पोलखोल होत आहे. त्यामुळे राज कोणता नवा व्हिडीओ घेऊन येतात अशी चर्चा सुरू असते.
अडचणीत आलेल्या भाजपने राज यांना रोखण्यासाठी हालचाली सुरू केल्याचा आरोप पानसे यांनी केला. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील या बैठकीत राज यांच्यावर कोणते गुन्हे दाखल करता येतील? मतदानाचा अधिकार काढून घेता येईल का? याबाबत चर्चा झाली. राज यांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न झाल्यास महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही पानसे यांनी दिला.