राज ठाकरे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार; मनसे नेत्यांसोबत आज महत्त्वपूर्ण बैठक

By प्रविण मरगळे | Published: January 12, 2021 08:54 AM2021-01-12T08:54:03+5:302021-01-12T08:56:06+5:30

गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांनी कोणत्याही मुद्द्यावर भाष्य केले नव्हते, कोरोना काळात अनेकांनी समस्या सोडवण्यासाठी कृष्णकुंजवर धाव घेतली होती

Raj Thackeray to interact with office bearers; Important meeting with MNS leaders today | राज ठाकरे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार; मनसे नेत्यांसोबत आज महत्त्वपूर्ण बैठक

राज ठाकरे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार; मनसे नेत्यांसोबत आज महत्त्वपूर्ण बैठक

Next
ठळक मुद्देराज्यभरातील ग्रामपंचायती निवडणुका पूर्ण ताकदीने लढवाव्यात असे आदेश राज ठाकरेंनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना दिले होतेअनेक पदाधिकारी ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोधही निवडून आले आहेत.आगामी महापालिका निवडणुकांमध्ये भाजपासोबत आघाडी करणार का?

मुंबई – राज्यात सुरू असणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका आणि आगामी काळात असणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेची आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडत आहे, या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार असून यात प्रमुख नेते, सरचिटणीसांना बोलवण्यात आलं आहे. वांद्रे येथील एमआयजी क्लब येथे सकाळी १० वाजता बैठकीला सुरूवात होईल.

गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांनी कोणत्याही मुद्द्यावर भाष्य केले नव्हते, कोरोना काळात अनेकांनी समस्या सोडवण्यासाठी कृष्णकुंजवर धाव घेतली होती, त्यात कोळी बांधव, बॅन्जो पथक, डॉक्टर, वारकरी, महिला अशा विविध गटांचा समावेश होता, राज ठाकरेंनी विषय घेतला आणि तो मार्गी लागला अशी चर्चा सातत्याने सुरू होती, दरम्यानच्या काळात वीजबिलावरून राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेत वीजबिलात कपात करण्याची सूचना सरकारला द्यावी अशी मागणी केली होती.

अलीकडे एका कार्यक्रमानिमित्त राज ठाकरे पुण्यात गेले होते, त्याठिकाणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरेंनी बैठक घेतली, यानंतर राज्यभरातील ग्रामपंचायती निवडणुका पूर्ण ताकदीने लढवाव्यात असे आदेश राज ठाकरेंनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना दिले होते, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र यांच्यासह अनेक भागात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीत उमेदवार उभे केले आहेत, काही ठिकाणी स्थानिक पातळीवरील पक्षांसोबत आघाडी केली आहे. अनेक पदाधिकारी ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोधही निवडून आले आहेत.

येत्या काही महिन्यात राज्यात कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, वसई-विरार,  नवी मुंबई आणि औरंगाबाद या महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत, त्यामुळे राज ठाकरेंनी पक्षसंघटन वाढीसाठी पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे, यात राज ठाकरे वैयक्तिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील, या बैठकीपूर्वी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या परिसरातील स्थानिक राजकीय माहिती, समस्या आणि मनसेचे कार्य याबाबत अहवाल सादर करण्याची सूचना देण्यात आली होती.

महत्त्वाचं म्हणजे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवरील गणित जुळवून घेताना भाजपासोबत आघाडी करायची का? यावरदेखील मनसेच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांनी अलीकडच्या काळात कोणतीही विधानं केली नाहीत, मात्र मनसेची भूमिका दुसऱ्या फळीतील नेत्यांकडून येत असते, मनसेच्या कार्यकर्त्यांकडूनही स्थानिक पातळीवरील समस्यांसाठी आंदोलन सुरू असतात. त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीत राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय आदेश देतात हे पाहणं गरजेचे आहे.

Web Title: Raj Thackeray to interact with office bearers; Important meeting with MNS leaders today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.