पुण्यापाठोपाठ 'या' महापालिकेतही महाराष्ट्र सैनिकांची स्वबळाची हाक; भाजपासोबत युती नको
By प्रविण मरगळे | Published: February 9, 2021 11:16 AM2021-02-09T11:16:46+5:302021-02-09T11:18:40+5:30
MNS BMC Election Updates: गेल्या काही दिवसांपासून राज्यात मनसे-भाजपा युतीची चर्चा सुरू आहे, मात्र पुण्यात मनसे पदाधिकाऱ्यांनी महापालिका निवडणुका स्वबळावर लढवाव्यात अशी मागणी केली
मुंबई – काही दिवसांपूर्वी पुण्यात राज ठाकरेंनीमनसे नेत्यांच्या बैठका घेतल्या होत्या, आगामी महापालिका निवडणुकांसाठी मनसेने जोरदार तयारी सुरू केली आहे, येत्या काळात नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण डोंबिवली, औरंगाबाद महापालिका निवडणुका पार पडणार आहेत, या पार्श्वभूमीवर राज ठाकरे मनसे नेत्यांच्या बैठका घेत आहेत, पुढीलवर्षी मुंबई, पुणे मनपा निवडणुकांच्या दृष्टीनेही मनसे तयारीला लागली आहे.
यातच गेल्या काही दिवसांपासून राज्यात मनसे-भाजपा युतीची चर्चा सुरू आहे, मात्र पुण्यात मनसे पदाधिकाऱ्यांनी महापालिका निवडणुका स्वबळावर लढवाव्यात अशी मागणी केली, आता त्यापाठोपाठ मुंबईतील महाराष्ट्र सैनिकांनीही महापालिका निवडणूक स्वबळावर लढवावी अशी मागणी केली आहे, मुंबईतील प्रत्येक लोकसभा मतदारसंघानिहाय मनसे नेत्यांच्या बैठका सुरू आहेत, मुलुंड येथे मनसे नेते अमित ठाकरे आणि सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली, (MNS Preparation for Upcoming Municipal Elections)
या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे म्हणाले की, सध्या विविध भागात मनसेच्या बैठका होत आहेत, गेल्या २ दिवसांपासून हे सुरू आहे, आजही बैठक होतेय, महाराष्ट्र सैनिकांशी संवाद सुरू आहे. २०१७ च्या महापालिका निवडणुकीनंतर खूप पाणी पुलाखालून वाहिलं आहे. २०१७ च्या निवडणुकीत जे मतदान झालं त्यापेक्षा दुप्पट मतदान २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेला झालं आहे, त्यामुळे मुंबई महापालिकेत २२७ वार्ड पूर्ण ताकदीने लढले पाहिजे अशी भावना आणि इच्छा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली, परंतु किती व कोणत्या जागा लढवायच्या याचा सर्वस्वी निर्णय राजसाहेब घेतील असं ते म्हणाले.
अमित ठाकरेंची महाराष्ट्र सैनिकांमध्ये क्रेझ
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अमित ठाकरेंना ईशान्य मुंबईची जबाबदारी दिली आहे, त्यानुसार तेथील कार्यकर्त्यांशी अमित ठाकरे संवाद साधत आहेत, त्यामुळे प्रचंड उत्साहाचं वातावरण तेथील कार्यकर्त्यांमध्ये आहे, तरूण वर्गात आणि महाराष्ट्र सैनिकात अमित ठाकरेंची क्रेझ आहे, त्यामुळे ते एका भागात मर्यादित राहणार नाही, सर्व महापालिका निवडणुकांमध्ये त्यांची भूमिका राहील. कार्यकर्त्यांना भेटतील, महापालिका निवडणुकीपूर्वी प्रत्येक वार्डाचा आढावा घेतला जातोय, कोणती कामं केल्यानंतर मतदान वाढेल यासाठी रणनीती आखली जात आहे अशी माहितीही संदीप देशपांडेंनी दिली.