Raj Thackeray: लग्न कुणाचंही असलं तरी नाचणं गैर असतं काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 11:53 AM2019-04-16T11:53:47+5:302019-04-16T11:55:59+5:30
टीका नाकाला झोंबू लागली, की लोक पातळी सोडून बेताल बोलायला लागतात. आता तर निवडणुकीचा ज्वर जसा वाढेल तसे कमरेखाली वार करणे सुरू झाले आहे.
- धनाजी कांबळे
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या महाराष्ट्राच्या प्रमुख जिल्ह्यांमध्ये जाहीर सभा घेत आहेत. त्यांच्या सभेचा खर्च कोण करतं? असा प्रश्न उपस्थित केला जात असला, तरी तो गौण मुद्दा आहे. देशासमोरचे महत्त्वाचे प्रश्न पुन्हा एकदा राज ठाकरे जनतेला आठवणीत आणून देत आहेत, हे महत्त्वाचे नाही का? नोटाबंदी, जीएसटी, देशाची सुरक्षा, स्मार्ट सिटी, स्टार्ट अप इंडिया, क्लीन सिटी, नमामि गंगा अशा मुद्द्यांचे पुढे काय झाले, असा प्रश्न विचारत आहेत. त्यामुळे पुन्हा विस्मृतीत गेलेल्या गोष्टी नव्याने पुढे येत आहेत. ज्याचा निश्चितपणे कुणाला तरी फटका बसणार असून, कुणाला तरी फायदा होणार आहे. त्यामुळेच निवडणुकीच्या रिंगणात नसले तरी राज ठाकरे चर्चेत आले आहेत.
टीका नाकाला झोंबू लागली, की लोक पातळी सोडून बेताल बोलायला लागतात. आता तर निवडणुकीचा ज्वर जसा वाढेल तसे कमरेखाली वार करणे सुरू झाले आहे. विशेषत: महाराष्ट्राच्या राजकारणात केवळ शरद पवार यांच्यावरच टीका करण्याचा एक कलमी कार्यक्रम जाणीवपूर्वक भाजपकडून सुरू आहे. राष्ट्रीय मुद्दे बाजूला ठेवून केवळ नेत्यांवर टीका केली जात आहे. यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका मात्र आजच्या परिस्थितीत महत्त्वाची आहे. विशेष म्हणजे ते ज्या पद्धतीने पुराव्यानिशी मोदी आणि अमित शहा यांचे जुने व्हिडिओ दाखवून जनतेला जागे करत आहेत. अर्थात आपल्या पक्षाचा एकही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नसताना राज ठाकरे ज्या त्वेषाने आणि जोशाने देशासमोरचे मुद्दे उपस्थित करीत आहेत त्यामुळे काही प्रमाणात त्यांच्यावर टीकाही केली जात आहे. मात्र, या टीकेमागे राजकीय स्वार्थ आहे, हे जनता जाणते.
तरीदेखील नांदेडमधील सभेमध्ये भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांचा खरपूस समाचार घेतला. या वेळी ते म्हणाले, ‘मनसे म्हणजे मतदार नसलेली आणि उमेदवार नसलेली सेना आहे. लग्न दुस-याचेच आहे आणि त्यात हे नाचत आहेत. हे म्हणजे रताळ्याला म्हणतात केळं आणि दुस-याच्या लग्नात नाचतंय खुळं, अशी अवस्था राज ठाकरे यांची झाली आहे. सभेसाठी आतापर्यंत खुर्च्या, तंबू किरायाने मिळत होते आता तर नेते आणि पक्षच किरायाने मिळू लागले आहेत. मनसेने हा नवा पॅटर्न उदयास आणला आहे. मनसेची भूमिका म्हणजे ‘दुस-याच्या लग्नात नाचतंय खुळं...’, अशी झाल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली होती. परंतु, राज ठाकरे जे प्रश्न उपस्थित करीत आहेत किंवा राहुल गांधी जे प्रश्न विचारत आहेत, त्यांची उत्तरे भाजप किंवा सेनेचा कोणताच नेता देताना दिसत नाही. भाजप-सेनेच्या नेत्यांची चुप्पीच सगळे सांगून जात आहे, हे त्यांच्या ध्यानातही येऊ नये, अशी सध्याची स्थिती आहे.
नोटाबंदी, जीएसटी, स्टार्ट अप इंडिया, मेक इन इंडिया, स्मार्ट सिटी, कर्जमाफी, राफेलचा करार, देशाची सुरक्षितता असे महत्त्वाचे मुद्दे राज ठाकरे असतील, किंवा अॅड. प्रकाश आंबेडकर, खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी हे भाजप-सेनेच्या विरोधात आवाज उठवत असताना, याबद्दल नेहमीप्रमाणे कुणीच भाजप-सेनेचे नेते बोलत नाहीत. विशेष म्हणजे ज्या वेळी दिल्लीत संसदेसमोर देशाची राज्यघटना जाळण्यात आली, शेतक-यांवर लाठीमार करण्यात आला तेव्हाही देशाचे पंतप्रधान म्हणून मोदींची जबाबदारी असतानादेखील त्यांनी चकार शब्द कधी बाहेर काढला नाही किंवा ट्विटरवर कॉमेंट केली नाही. त्यांनी मौन धारण केले होते. तीच गोष्ट उत्तर प्रदेशातील हिंसाचार आणि महात्मा गांधीजींच्या प्रतिमेला गोळ्या घालणा-या देशद्रोही प्रवृत्तीबद्दलही त्यांनी काही वक्तव्य केले नाही. खरं म्हणजे भाजप विरोधी बाकावर होते तेव्हा तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना नेहमीच दोष देणारे आणि बांगड्या पाठविण्याची भाषा करणारे, त्यांना मौनी म्हणणारे लोक आज सत्तेत असताना ज्या दुष्ट प्रवृत्ती देशद्रोही घटनांना पाठिंबा देत आहेत, किंवा त्यासारखी कृती करीत आहेत त्यांच्याबद्दल काहीही बोलताना दिसत नाहीत. त्यामुळेच आज राज ठाकरे जे मुद्दे उपस्थित करीत आहेत, ते भाजप-सेनेच्या नेत्यांना झोंबत आहे. त्यामुळेच ते अशा पद्धतीची भाषा वापरत आहेत. मात्र, राज ठाकरे यांच्या पक्षाचा कोणताही उमेदवार उभा नसला तरी आज देशात अघोषित आणीबाणीसारखी जी परिस्थिती निर्माण झाली आहे.
झुंडशाही बोकाळली आहे. व्यक्तिस्वातंत्र्य, लोकशाही व्यवस्था धोक्यात आलेली असताना, भाजप-सेनेचे नेते जाहीरपणे देशाची राज्यघटना बदलण्यासाठी आम्हाला निवडून द्या, असे आवाहन करीत असताना निवडणूक आयोग अथवा तत्सम कोणतीच यंत्रणा कोणताही आक्षेप घेताना दिसत नाही. त्यामुळेच राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका त्या दृष्टीने महत्त्वाची आहे. माणूस कोणतीही गोष्ट फार काळ आठवणीत ठेवू शकत नाही. तो लवकर विसरून जातो. त्यामुळे आज जनतेला आठवण करून देण्याचे काम राज ठाकरे करीत आहेत. प्रत्येक वेळी आपला उमेदवार उभा असेल, तरच आपण प्रचार केला पाहिजे, असे नसते. जनतेचे प्रबोधन करणेही तेवढेच महत्त्वाचे असते. विशेष म्हणजे राज ठाकरे यांना प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या विचारपरंपरांचा वारसा आहे. त्यामुळेच त्यांनी आज जो आसूड आपल्या भाषणांमधून उगारण्याचे काम सुरू केले आहे, ते कुणी ना कुणी करण्याची आवश्यकता होतीच. आता मुद्दा उपस्थित होत आहे, की त्यांच्या सभेचा फायदा नेमका कुणाला होणार? तर त्याबद्दलही राज ठाकरे यांनी आपली भूमिका सुरुवातीलाच जाहीर केली आहे. ज्यांना फायदा व्हायचा असेल, तो होऊ दे, पण देशाचा नागरिक म्हणून जनतेला जागरूक करण्याचे काम कुणीही करू शकतो. ते काम मी करणार आहे, असे त्यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले आहे.
मग फायदा नेमका कुणाला?
आज फक्त महाराष्ट्राचा विचार केला तर २०१४ मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दोन अंकापर्यंतही जाता आले नव्हते. आता देशातील आणि राज्यातीलही चित्र बदलले आहे. आजची हवा वेगळी आहे. या वेळी होत असलेली निवडणूक ही अतिशय महत्त्वपूर्ण असून, लोकशाही व्यवस्था आणि संविधान रक्षणासाठी, समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व टिकवून ठेवण्यासाठीची आहे. फसवणुकीपासून जनतेला सावध करण्याची आहे. त्यामुळेच भाजप आणि शिवसेनेने आपसातच जे वादाचे प्रसंग निर्माण केले, किंबहुना वाद असल्याचे किंवा आम्ही खिशातच राजीनामे घेऊन फिरत असल्याचे दाखवले असले, तरी भाजप आणि शिवसेना दोघेही एकत्रितपणेच निवडणुका लढवतील, असा अंदाज उभ्या महाराष्ट्राला होताच. पण, तरी भाजप-सेनेचे भांडण अगदी निवडणुका जाहीर होईपर्यंत रंगवण्यात आले होते.
आम्ही कुणाच्या दारात कटोरा घेऊन जाणार नाही अशी भीष्मप्रतिज्ञा करणारे लोक आज मांडीला मांडी लावून बसले आहेत. त्यामुळे राजकीय फायद्यासाठी कोणतेही हाडवैरी एकत्र येऊ शकतात, हे महाराष्ट्रातील सुज्ञ जनतेला माहिती आहे. त्यामुळे आज देशातले वारे बदलले आहे. जे लोक आज एकत्र आहोत, असे दाखवत आहेत, त्यांचे नेते एक झाले असले, तरी कार्यकर्ते आजही संभ्रमात आहेत. त्यामुळे आता मनसेचा किंवा राज ठाकरे यांच्या सभांचा फायदा कोणाला होणार अशी चर्चा करताना तो काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीलाच होणार हे उघड आहे. पण, तरीही या वेळी महाराष्ट्रातील राजकीय स्थिती थोडीफार बदलली आहे.
केवळ सेना-भाजप युती विरुद्ध काँग्रेस आघाडी अशी लढत राहिलेली नाही. त्यात आता अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या पुढाकारातून झालेल्या वंचित बहुजन आघाडीसोबतही यांची लढाई आहे, हे दुर्लक्षित करता येणार नाही. कारण, निवडणुका जाहीर होण्याआधी सात ते आठ महिने प्रकाश आंबेडकरांनी ज्या झंझावाती सभा महाराष्ट्राच्या प्रमुख जिल्ह्यांमध्ये घेतल्या आहेत, त्याला जमलेली गर्दी ही लाखोंच्या संख्येने होती. विशेष म्हणजे स्वत:ची भाजी-भाकरी घेऊन सभेला आलेले लोक एक दिवसाची मजुरी बुडवून आले होते. ती गर्दी मतांमध्ये परावर्तित झाल्यास महाराष्ट्राचे राजकारण एक नवे वळण घेऊ शकते. आंबेडकर यांनी अलुतेदार-बलुतेदारांची मोट बांधून केलेले सोशल इंजिनिअरिंग किती यशस्वी ठरते, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.