राज ठाकरे कुणाचे स्टार प्रचारक?-भाजपचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 06:13 AM2019-04-17T06:13:12+5:302019-04-17T06:13:33+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपचे स्टार प्रचारक आहेत. त्यांच्या प्रचाराचा खर्च निवडणूक आयोगाला पक्षाच्या खर्चातून नियमितपणे सादर केला जातो,
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपचे स्टार प्रचारक आहेत. त्यांच्या प्रचाराचा खर्च निवडणूक आयोगाला पक्षाच्या खर्चातून नियमितपणे सादर केला जातो, परंतु मनसे निवडणूकच लढवित नसल्यामुळे त्यांना कदाचित या गोष्टी समजत नसतील, असा टोला लगावतानाच मोदी भाजपचे स्टार प्रचारक आहेत, राज ठाकरे कोणत्या पक्षाचे स्टार प्रचारक आहेत, हे मनसेने जाहीर करावे, असे आव्हान भाजपने दिले आहे.
भाजपने निवडणूक आयोगाकडे मनसेचा खर्च मागितला नव्हता, तर राज ठाकरे यांच्या सभांचा खर्च कोणत्या उमेदवाराच्या खात्यात दाखविणार, एवढीच विचारणा व मागणी आयोगाकडे केली होती. यावर, मनसेने आधी पंतप्रधानांच्या सभेचा खर्च मागितला. मोदी भाजपचे स्टार प्रचारक आहेत. त्यामुळे नियमानुसार पक्षाच्या खर्चातून ती माहिती निवडणूक आयोगाकडे सादर केली जाते, परंतु मनसे निवडणूक लढवत नाहीत, केवळ प्रचार सुरू आहे. त्यामुळे ही साधी बाब त्यांच्या ध्यानात आली नसावी, अशी कोपरखळी मारतानाच, राज ठाकरे कोणत्या पक्षाचे स्टार प्रचारक आहेत, हे मनसेने जाहीर करावे, असे आवाहनही तावडे यांनी यावेळी केले.
मोदी जर पुन्हा पंतप्रधान झाले, तर काँग्रेस-राष्ट्रवादीचे काही खरे नाही. त्यामुळे आता आमची अस्तित्वाची लढाई सुरू आहे, असे स्पष्ट विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी एका मुलाखतीत केले आहे. काँग्रेसला राज्यात स्ट्राँग नेता नसल्यामुळे, मोदी पवारांवर टीका करतात. त्यामुळे काँग्रेसचे आव्हानच नाही, तर अस्तित्वच जवळजवळ संपल्यासारखे असल्याचे पृथ्वीराज बाबांनी मान्य केले आहे. त्यांच्या या विधानावरून आघाडी महाराष्ट्रात लोकसभेची एकही जागा जिंकणार नाही, हे स्पष्ट झाल्याचेही तावडे म्हणाले.