Raj Thackeray Vs Sharad Pawar: राज ठाकरेंनी शरद पवारांना पुन्हा डिवचले, प्रबोधनकारांचे विचार शेअर करत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 02:48 PM2021-08-21T14:48:49+5:302021-08-21T14:50:39+5:30
Raj Thackeray Vs Sharad Pawar: राज ठाकरेंच्या विधानावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी त्यांना प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार वाचण्याचा सल्ला दिला होता.
मुंबई - मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी एका कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच जातीवादाचा मुद्दा प्रखरतेने समोर आला असं मत मांडलं होतं. (Raj Thackeray Vs Sharad Pawar: ) राज ठाकरेंच्या या विधानानंतर मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जोरदार वाद पेटला आहे. राज ठाकरेंच्या विधानावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी त्यांना प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार वाचण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी थेट प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार ट्विट करत शरद पवारांना पुन्हा एकदा डिवचले आहे. ( Raj Thackeray chased Sharad Pawar again, sharing Prabodhankar's thoughts )
राज ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या माझी जीवनगाथा या पुस्तकातील विचार ट्विट केले आहेत. "जिथे चिकित्सा-स्वातंत्र्य नाही, तिथे बौध्दिक विकास नाही... जिथे बौध्दिक विकासाला बंदी, तिथे राज्यकर्त्यांनी समाज-विकासावर मोठमोठी व्याख्याने देणे, म्हणजे बांडगुळानेच झाडाचं रक्त शोषणं होय!" हे विचार राज ठाकरे यांनी शेअर केले आहेत. त्यामुळे आता यावर राष्ट्रवादीकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
"जिथे चिकित्सा-स्वातंत्र्य नाही, तिथे बौध्दिक विकास नाही... जिथे बौध्दिक विकासाला बंदी, तिथे राज्यकर्त्यांनी समाज-विकासावर मोठमोठी व्याख्याने देणे, म्हणजे बांडगुळानेच झाडाचं रक्त शोषणं होय!"
— Raj Thackeray (@RajThackeray) August 21, 2021
: प्रबोधनकार ठाकरे
'माझी जीवनगाथा' (पाने २८०-२८१)
इथून झाली होती वादाला सुरुवात
महाराष्ट्रामध्ये जाती पहिल्यापासून होत्या. प्रत्येकाला आपल्या जातीबद्दल एक अभिमान होता. तसेच जातीवरती मतदानही व्हायचं आणि ते आजही होतं. मला सध्या सध्या महाराष्ट्रामध्ये असं दिसतं की, लोकांना जातीबद्दल अभिमान हा आहेच, पण दूसऱ्याच्या जातीबद्दलचा द्वेष वाढत गेला आहे. हे महाराष्ट्राच्या एकूण सांस्कृतीला डाग लावणार चित्र आहे, असं राज ठाकरे यांनी सांगितलं होतं.
तसेच प्रत्येकाला आपल्या जातीबद्दल अभिमान असतो. मात्र दूसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष हा वाटणं, हे कधी महाराष्ट्रात नव्हतं. हे गेल्या २०-२५ वर्षांपासून सुरु झालं. जातीचा मुद्दा त्यांच्या त्यांच्या नेत्यांच्या ओळखीचा भाग झाला आहे. महाराष्ट्रात जातीचा मुद्दा हा सर्वांथाने मोठा झाला असेल, तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जन्मानंतर. कोण जेम्स लेन, कसलं पुस्तक लिहिलं? तो काय जॉर्ज बर्नार्ड शॉ होता. बरं तो आता कोण आहे आणि कुठे आहे? त्या सगळ्या वातावरणात मराठा समाजाच्या मुलांना, मुलींना, हे कोणी लिहिले तर ब्राम्हणांनी लिहिले मग माळी समाज मग इतर समाज हे सगळं रचलेलं आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं.