"राज ठाकरेंच्या जीवाला पाकिस्तानी दहशतावाद्यांकडून धोका, सुरक्षा हटवण्याचा निर्णय खुजेपणाचा’’
By बाळकृष्ण परब | Published: January 10, 2021 11:23 PM2021-01-10T23:23:37+5:302021-01-11T07:05:26+5:30
Raj Thackeray News : राज ठाकरेंच्या रोखठोक स्वभावामुळे अनेक हितशत्रू साहेबांबद्दल वैर बाळगून आहेत,
मुंबई - भाजपाच्या अनेक नेत्यांसह मनसेप्रमुखराज ठाकरे यांची सुरक्षाव्यवस्था घटवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयावरून सध्या उलटसुटल प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरेंच्या सुरक्षाव्यवस्थेत घट करण्याच्या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. राज ठाकरेंच्या जीवाला देशातील विघ्नसंतोषी लोकांपासून ते पाकिस्तानी दहशतवाद्यांपर्यंत धोका आहे. त्यांची सुरक्षा वाढविण्याऐवजी कमी करण्याचा घेतलेला निर्णय हा सरकारचे "खुजेपण" ठळकपणे दाखविणारा आहे, अशी टीका बाळा नांदगावकर यांनी केली आहे.
राज्य सरकारने राज ठाकरेंच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्याच्या घेतलेल्या निर्णयावर बाळा नांदगावकर यांनी फेसबूकवर पोस्ट लिहून सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. त्यात ते लिहितात की, राज्य सरकारने विरोधी पक्षातील नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली. त्यात राज ठाकरेंचेही नाव आले. सरकार कोणाचेही असो वास्तवाचे भान ठेवून असे निर्णय घ्यायला हवेत. राज ठाकरेंच्या रोखठोक स्वभावामुळे अनेक हितशत्रू साहेबांबद्दल वैर बाळगून आहेत, परंतु साहेबांनी कधी अशा हितशत्रूंची तमा बाळगली नाही. साहेबांच्या एका आवाजावर अनेक सामान्य लोकांना संरक्षण देणारे हजारो महाराष्ट्र सैनिक या राज्यात आहेत.
बाळा नांदगावकर म्हणाले, सरकार दरबारी जी कामे होत नाहीत किंवा ज्या विषयांना मतपेटी साठी टाळले जाते असे अनेक विषय राज ठाकरेंच्या हस्तक्षेपाने निकालात निघतात. राज ठाकरेंच्या जीवाला आपल्या देशातील विघ्नसंतोषी लोकांपासून तसेच पाकिस्तानी दहशतवाद्यांपर्यंत धोका असल्याचे आपण जाणूनच आहोत. तरी त्यांची सुरक्षा वाढविण्याऐवजी कमी करण्याचा घेतलेला निर्णय हा सरकारचे "खुजेपण" ठळकपणे दाखविणारा आहे. चीड या गोष्टीची येते की यात ज्यांना नव्याने सुरक्षा देण्याचा अथवा ज्यांची सुरक्षा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे या यादीतील काही नावे बघितल्यास एकच प्रश्न उपस्थित होतो ते म्हणजे सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? सरकारने ज्या नवीन लोकांना सुरक्षा देण्याचे तसेच सुरक्षा वाढविण्याचे ठरविले त्यापेक्षा तोच पैसा आरोग्य व्यवस्था विकासासाठी वापरला असता तर अतिशय चीड आणणारी भंडारा जिल्ह्यातील 10 बाळांचा जीव घेणारी घटना टाळता आली असती, असा टोलाही बाळा नांदगावकर यांनी लगावला.