'राज ठाकरेंच्या सभांचा परिणाम निश्चितच होणार; त्यांना आमचे धन्यवाद!'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 05:26 AM2019-04-27T05:26:41+5:302019-04-27T06:52:52+5:30
मुलाला तिकीट नाकारल्यानेच राधाकृष्ण विखे यांचा राजीनामा
- अतुल कुलकर्णी
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशाची आर्थिक स्थिती पूर्णपणे बिघडली. जनतेशी ते खोटं बोलले, नोटाबंदीमुळे त्यांनी देशाला अनेक वर्षे मागे नेले, त्यांच्या या सगळ्या गोष्टी मनसे अध्यक्ष राज ठाकरे जाहीर सभांमधून मांडत आहेत. त्याचा जो काय परिणाम व्हायचा तो होईल, पण मी यासाठी राज ठाकरे यांना धन्यवाद देतो, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी मनसेविषयीची भूमिका स्पष्ट केली.
मनसेला महाआघाडीत घ्यावे अशी राष्ट्रवादीची इच्छा होती, पण काँग्रेसने त्याला विरोध केला. मात्र, आता विधानसभेत त्यांना सोबत घेण्याची तुमची इच्छा आहे का?
लोकसभेत कोणत्या पक्षांना आघाडीत घ्यावे याच्या निर्णय प्रक्रियेत मी नव्हतो. तो निर्णय राज्याच्या कमिटीने घेतला होता. त्यामुळे मी त्यावर काही भाष्य करणार नाही. विधानसभेतही त्यांच्या पक्षाला सोबत घ्यावे की नाही, याचा निर्णय राज्य कार्यकारिणीने आधी करायचा आहे. त्यावर हायकमांड आपले मत देईल.
स्टार प्रचारकांच्या यादीत तुम्ही युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षास डावलले व ज्यांची भाषणे कधी कोणी ऐकलेली नाहीत, अशांचा समावेश केला गेला. याचा परिणाम निवडणुकीवर होत नाही का?
काही नावे सोशल इंजिनीअरिंगसाठी घ्यावी लागतात. काहींची नावे राहिली असतील, पण आता मतदानास फक्त २ दिवस उरले आहेत. त्यामुळे आता झालेल्या चुका विधानसभेच्या वेळी दूर करू.
विधानसभेसाठी राजीव सातवांना प्रमोट करण्याचे प्रयत्न असल्याचे बोलले जाते. यात तथ्य किती आहे?
लोकसभेचा निकाल लागल्यानंतरच्या या गोष्टी आहेत. त्यावर आता मतदान प्रक्रिया सुरू असताना बोलणे योग्य होणार नाही, पण योग्यवेळी योग्य निर्णय घेतले जातील.
राज्यात विरोधी पक्षाचे खरे काम एकही उमेदवार न लढवणारे राज ठाकरे करत आहेत, काँग्रेस मात्र निवडणुकीच्या मूडमध्येच आली नाही असे वाटते, त्याचे काय?
असे म्हणणे काँग्रेसवर अन्याय केल्यासारखे होईल. आम्ही संघर्ष यात्रा राज्यभर काढली. पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी राज्याचे दौरे केले, शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही जोमाने मांडले, पण त्यावर भाजपा काहीही बोलू शकलेली नाही. ‘भाजपचा शिशुपाल, मोदी सरकारचे १०० गुन्हे’ हे पुस्तकाच्या रूपाने आम्ही समोर आणले.
तुमचा प्रचार फक्त मोदींना विरोध करण्यात होत आहे असे वाटत नाही का?
२०१४ साली लोकशाहीच्या नावावर मते मागत मोदी सत्तेत आले. मात्र, नंतर ते हिटलरसारखे वागत राहिले. गेल्या ५ वर्षांतली त्यांची कारकिर्द हिटलरची होती. पूर्वी ते ‘भाजप सरकार’ म्हणायचे. आता मात्र ते सतत ‘मोदी सरकार’ म्हणत आहेत. स्वत:चा पक्ष ही त्यांनी बासनात गुंडाळून ठेवला आहे. इतके ते स्वकेंद्रीत झाले आहेत. भावनेशी खेळून ते सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. जनता शहाणी आहे. ती या वागण्याची योग्य ती दखल नक्कीच घेईल.
काँग्रेस, राष्ट्रवादीने एकत्रित एकही प्रचार सभा घेतली नाही, त्याचे कारण काय?
राहुल गांधी यांनी महाराष्ट्रत चार पाच सभा घेतल्या. त्यांना संपूर्ण देशात फिरायचे आहे. त्यांच्याही मतदारसंघात जायचे आहे. आम्हाला मुंबईत रॅली करायची होती पण वेळेअभावी ते जमले नाही. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार राज्यभर फिरतच आहेत. पण एकत्र सभा घेणे वेळेअभावी जमले नाही.
‘लोकमत’शी बोलताना खरगे म्हणाले, राज यांनी अमित शहा आणि मोदी या दोघांविरुद्ध महाराष्ट्रात मोठे कॅम्पेन केले. त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याचे रिपोर्ट दिल्लीत आले आहेत. त्यामुळे राज यांच्यासह जे कोणी मोदींच्या विरोधात बोलतील, त्या सगळ्यांचे आम्ही स्वागत करतो.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुंबई अध्यक्षपदावरून संजय निरुपम यांना दूर करून मिलिंद देवरा यांची निवड केली, राधाकृष्ण विखे यांचा राजीनामा घेण्यास विलंब केला, याच्या परिणामांचा विचार नेतृत्वाने केला नाही का?
काँग्रेसमध्ये अनेक महत्त्वाच्या विषयावर निर्णय घेण्यास विलंब होतो, हे काहीअंशी खरे आहे. निर्णय क्षमता गतिमान करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. काही विषयांच्या बाबतीत पक्षात अंतर्गत मतभेद होते. विखे यांनी मुलाला तिकीट नाकारल्यानंतरच लगेच राजीनामा दिला होता, पण त्यावर निर्णय घेण्यास विलंब झाला. मुंबई अध्यक्षपदाचा निर्णय सहा महिने आधी घ्यायला हवा होता, पण त्यावेळी काही कारणांनी तो होऊ शकला नाही. मात्र, निरुपम आणि देवरा दोघांनीही चांगले काम केले आहे. दोघेही निवडून येतील, याचा मला ठाम विश्वास आहे.