मोठी बातमी! रजनिकांत राजकीय पक्ष काढणार नाहीत, जाहीर केली माघार
By मोरेश्वर येरम | Published: December 29, 2020 12:58 PM2020-12-29T12:58:49+5:302020-12-29T13:01:15+5:30
"मला सांगताना अतिशय वाईट वाटतंय की मी सध्यातरी कोणताही राजकीय पक्ष सुरू करणार नाही"
तामिळनाडू
सुपरस्टार रजनिकांत यांनी आज तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीआधी मोठी घोषणा केली आहे. कोणताही राजकीय पक्ष स्थापन करत नसल्याचं रजनिकांत यांनी एका पत्रकाच्या माध्यमातून जाहीर केलं आहे. रजनिकांत यांची प्रकृती ठीक नसल्यानं त्यांनी माघार घेतल्याचं सांगितलं जात आहे.
"मला सांगताना अतिशय वाईट वाटतंय की मी सध्यातरी कोणताही राजकीय पक्ष सुरू करणार नाही. पण तामिळनाडूच्या जनतेसाठी विविध माध्यमातून काम सुरुच राहील", असं रजनिकांत यांनी जाहीर केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती खालावल्याचाही उल्लेख त्यांनी पत्रकात केला आहे. याशिवाय, या निर्णयामागे मला 'बळीचा बकरा' बनविल्याच मत तयार करुन घेण्याचा गैरसमज कुणी करुन घेऊ नये, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
— Rajinikanth (@rajinikanth) December 29, 2020
रजनिकांत यांनी ३१ डिसेंबर रोजी राजकीय पक्षाची घोषणा करणार असल्याचं याआधी जाहीर केलं होतं. त्यासाठी त्यांनी तयारी देखील सुरू केली होती. नव्या वर्षात होणाऱ्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा रजनिकांत यांचा निर्णय जवळपास पक्का झाला होता. रजनिकांत यांना तामिळनाडूचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणूनही पाहिलं जाऊ लागलं होतं. पण आता रजनिकांत यांनी माघार घेतल्यामुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
रजनिकांत हैदराबादमध्ये आपल्या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण करत असताना आजारी पडले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रजनिकांत यांना आता डिस्चार्ज मिळाला असून ते राहत्या घरी आराम करत आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून रजनिकांत राज्यात आपल्या समर्थकांसोबत बैठका घेत होते. यात ते राजकारणात एण्ट्री घेण्यासाठीची पूर्वतयारी करत होते. गेल्याच वर्षी रजनिकांत यांनी याबाबतची माहिती ट्विटवर दिली होती. यावर्षाच्या शेवटी ते आपल्या राजकीय पक्षाची घोषणा करत होते.
तामिळनाडूमध्ये २०२१ मध्ये विधानसभा निवडणूक होणार असून यासाठी डीएमके, एआयएडीएमके, भाजप यांच्यासोबत अभिनेते कमल हसन यांचा पक्ष देखील रिंगणात उतरला आहे.