फारुख अब्दुल्ला म्हणाले, "श्रीराम सर्वांचेच, देव आणि अल्लाहमध्ये फरक करता येणार नाही"
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2021 08:42 PM2021-02-09T20:42:36+5:302021-02-09T20:44:40+5:30
भगवान श्रीराम हे सर्वांचे आहेत. तसंच अल्लाह आणि देवात फरक केला तर हा देश विभागला जाईल, अब्दुल्ला यांचं वक्तव्य
जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी मंगळवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेत सहभाग घेतला. "आज भारतानं मोठा पल्ला गाठला आहे. केवळ आपल्यालाच नाही तर पूर्ण जगाला भारत धान्य पुरवत आहे," असं ते यावेळी म्हणाले. तसंच भगवान श्रीराम हे सर्वांचे आहेत. तसंच अल्लाह आणि देवात फरक केला तर हा देश विभागला जाईल, असंही ते म्हणाले.
"प्रभू श्रीराम हे संपूर्ण जगाचे राम आहेत. जर ते संपूर्ण जगाचे राम आहेत तर ते आपल्या सर्वांचे राम आहेत. कुराण फक्त आमचं नाही, सर्वांचं आहे. जर तुम्ही कोणती चूक केली तर आम्ही ती बरोबर करू आणि आम्ही काही चूक केली तर ती तुम्ही बरोबर कराल. असाच देश चालतो," असं फारुख अब्दुल्ला म्हणाले.
मला भारतातच जगायचंय आणि मरायचंय
"आज तुम्ही आम्हाला पाकिस्तानी म्हणता, खलिस्तानी म्हणता, चिनी म्हणता. मला भारतातच जगायचं आहे आणि भारतातच मरायचंय. मी कोणालाही घाबरत नाही. मला फक्त वरच्याला उत्तर द्यायचंय. आम्ही तुम्हाला कधीच शत्रू मानलं नाही. तुम्हाचा आमचाच भाग मानला. जेव्हा तुम्ही विरोधी पक्षात असाल तेव्हा आम्ही तुमचा सन्मान करू आणि तुमच्यापेक्षाही अधिक करू," असंही त्यांनी नमूद केलं.
I feel really bad when we see that we're pointing fingers at Jawaharlal, Sardar Patel, Indira Gandhi, Rajiv Gandhi & other leaders. Tomorrow you may not be in power, will we talk about this PM then? This isn't Indian tradition. Respect the one who has gone: NC MP Farooq Abdullah pic.twitter.com/YzGX2CB8dz
— ANI (@ANI) February 9, 2021
"राज्याला जोडण्याचं आणि तेथील लोकांचं हृदय जिंकण्याचं काम केलं पाहिजे. सर्वांनी काश्मीरच्या नागरिकांना आपल्या हृदयाजवळ घ्या. सर्वांना सोबत घेऊन पुढे जा. जगाला दाखवून द्या की आम्ही काय आहोत. मी संयुक्त राष्ट्रातही भारताबाबत वक्तव्य केलं हा आमचाच देश आहे," असंही अब्दुल्ला म्हणाले.
आनंद केला व्यक्त
काश्मीरमध्ये काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा 4G सेवा पूर्ववत करण्यात आल्या. यावर अब्दुल्ला यांनी आनंद व्यक्त केला. १८ महिन्यांनंतर काश्मीरमध्ये 4G सेवा सुरू करण्यात आल्या आहेत याबद्दल आनंद आहे आणि त्या यापुढेही कायम राहो असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
लोकांच्या मदतीची गरज
"जास्तीत जास्त नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली गेली पाहिजे. लॉकडाऊन आणि कोरोना संकटामउळे आपल्याकडे बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. आमच्या प्रदेशातही परिस्थिती बिकट आहे. सरकारनं लोकांची मदत केली पाहिजे," असं अब्दुल्ला यांनी नमूद केलं. आज जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, राजीव गांधी, इंदिरा गांधी यांच्याबाबत प्रश्न उपस्थित केले जातात. ही भारतीय परंपरा नाही. ही परंपरा सुरू करू नका. जे आपल्यात नाहीत त्यांचा सन्मान करण्याचं आवाहनही फारूख अब्दुल्ला यांनी आपल्या भाषणादरम्यान केलं. तसंच यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनाचा उल्लेख करत सरकारनं शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे आणि समस्यांचं निराकरण केलं पाहिजे असं मतही व्यक्त केलं.