तुमच्या पक्षाच्या सर्वेसर्वांमध्ये इतर मतदार संघात उभं राहण्याची हिंमतही नाही; राम कदमांचा जयंत पाटलांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 05:42 PM2021-02-15T17:42:49+5:302021-02-15T17:46:04+5:30
'आयत्या बिळावर नागोबा' सारखे जाऊन बसलेल्या चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांची मापं काढणे बंद करावं, असं म्हणाले होते पाटील
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील वाद वाढत चालला आहे. शरद पवारांना माझ्याशिवाय करमत नाही, मी काहीच बोललो नाही तरीही माझ्यावर बोलतात असा चिमटा चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांना काढला होता. त्यावरून आता राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चंद्रकांतदादांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. चंद्रकांत पाटील पुण्यातल्या एका अतिशय चांगलं काम करणाऱ्या महिलेने तयार केलेला मतदारसंघ ताब्यात घेतला आणि तिथून निवडणूक लढवली हा पुरुषार्थ आहे का? असा सवालही त्यांनी केला होता. आता यावरून भाजपा नेते राम कदम यांनी जयंत पाटील याच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
"चंद्रकांत पाटील यांनी मारलेला बाण अचूक वर्मी बसलेला दिसतोय. म्हणूनच राष्ट्रवादीच्या प्रांताध्यक्षांनी इतकी उद्विग्न प्रतिक्रिया दिली. जयंत पाटील जे बोलले त्यातून एकच सिद्ध होते की चंद्रकांत पाटील महाराष्ट्रातून कुठूनही निवडून येऊ शकतात. मात्र, जयंत पाटील यांच्या बॉसना हे अजूनही जमत नाही," अशी बोचरी टीका राम कदम यांनी केली.
"आम्ही कधीही व्यक्तीगत टीका करत नाही. परंतु जयंत पाटील यांनी आपल्याच वक्तव्यावरून महाराष्ट्राला सांगितलंय की चंद्रकांत पाटील महाराष्ट्रातील कोणत्याही मतदारसंघातून निवडून येतात. त्यांच्या पक्षाचे सर्वेसर्वा इतर मतदार संघात उभं राहण्याची हिंमतदेखील करत नाही. चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य त्यांच्या वर्मी लागलेलं दिसतंय. जयंत पाटील यांनी यापूर्वीही चंद्रकांत पाटलांचं वय काढलं, पण वय काही असलं तर स्वत:च्या जीवाची पर्वा न करता ते गावोगावी कोरोना काळात फिरत होते. तुमचे सर्व मंत्री आणि सरकार एअर कंडिशन असलेल्या बंगल्यात स्वत:च्या जीवाची चिंता करत होतं हे अजूनही महाराष्ट्र विसरला नाही," असंही ते म्हणाले.
चंद्रकांतदादांनी मारलेला बाण अचूक वर्मी बसलेला दिसतोय. म्हणूनच राष्ट्रवादीच्या प्रांताध्यक्षांनी इतकी उद्विग्न प्रतिक्रिया दिली.@Jayant_R_Patil जे बोलले त्यातून एकच सिद्ध होते की,@ChDadaPatil महाराष्ट्रातून कुठूनही निवडून येऊ शकतात. मात्र, जयंतरावांच्या बॉसला हे अजूनही जमत नाही
— Ram Kadam - राम कदम (@ramkadam) February 15, 2021
काय म्हणाले होते पाटील?
"ज्या महिलेने मतदारसंघ लोकप्रियता मिळवली त्यावर 'आयत्या बिळावर नागोबा' सारखे जाऊन बसलेल्या चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांची मापं काढणे बंद करावे. विरोधी पक्षात आहात. जे काही आहे त्यावर रितसर बोलायला आमची तक्रार नाही पण चुकीचं बोलणार्यांचं इनडायरेक्टली समर्थन करण्याचा स्वभावदेखील बरा नव्हे," असा खोचक टोला जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला.
"चंद्रकांत पाटील यांना पक्ष कसा टिकवायचा याची चिंता पडली आहे त्यामुळे पाहिजे ते वारेमाप बोलत सुटले आहेत. पुण्यातल्या एका अतिशय चांगलं काम करणाऱ्या महिलेने तयार केलेला मतदारसंघ ताब्यात घेतला आणि तिथून निवडणूक लढवली हा पुरुषार्थ आहे का?," असा सवाल करत जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटलांवर बोचरी टीका केली. "मेधा कुलकर्णी यांनी त्यांचा मतदारसंघ जीवापाड जपला त्यांना बाजुला करुन प्रसंगी आपल्या अधिकाराचा वापर करून चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक लढवली. त्यामुळे स्वतःचा मतदारसंघ सोडून, स्वतःचा जिल्हा सोडून दुसरीकडे निवडणूक लढवावी लागली. त्या महिलेच्या लोकप्रियतेचा फायदा घेतला," असं जयंत पाटील म्हणाले.