"भारतरत्नांच्या चौकशीचे आदेश मागे घ्या, अन्...", राम कदमांचे गृहमंत्र्यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2021 12:13 PM2021-02-09T12:13:35+5:302021-02-09T12:21:10+5:30
Ram Kadam writes letter to Anil Deshmukh : राम कदम यांनी भारतरत्न पुरस्काराने सन्मानित गानकोकीळा लता मंगेशकर आणि भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, तसेच अभिनेता अक्षयकुमार, सुनील शेट्टी यांच्या ट्विटची चौकशी रद्द करण्याची मागणी केली आहे.
मुंबई : 'भारतरत्नां'ची चौकशी करण्याचे आदेश मागे घ्यावेत आणि सोनम कपूर, अनुराग कश्यप, फरहान अख्तर, परिणीती चोप्रा यासारख्या सेलिब्रिटींची चौकशी करावी, अशी मागणी भाजपा आमदार राम कदम यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात राम कदम यांनी अनिल देशमुख यांना पत्र लिहिले आहे. (Ram Kadam writes letter to Anil Deshmukh asks not to enquire Bharatratna Lata Mangeshkar Sachin Tendulkar)
राम कदम यांनी भारतरत्न पुरस्काराने सन्मानित गानकोकीळा लता मंगेशकर आणि भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, तसेच अभिनेता अक्षयकुमार, सुनील शेट्टी यांच्या ट्विटची चौकशी रद्द करण्याची मागणी केली आहे. याचबरोबर, काँग्रेसची भाषा बोलणारे सेलिब्रिटीची सोनम कपूर, अनुराग कश्यप, फरहान अख्तर, परिणीती चोप्रा, हृतिक रोशन, स्वरा भास्कर, अली फजल, रवीश कुमार, हार्दिक पटेल अशा विविध क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींत्या ट्विटची चौकशी करण्याची मागणी राम कदम यांनी अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.
#काँग्रेसच्या भाषेमध्ये परदेशी षडयंत्रकारीचे समर्थन ट्वीट करणाऱ्या सेलिब्रिटीची चौकशी कधी करणार?आणि भारत रत्नांच्या @mangeshkarlata@sachin_rt@akshaykumar@SunielVShetty यांच्या चौकशीचे आदेश मागे घ्यावे @AnilDeshmukhNCP@OfficeofUT#IndiaAgainstPropoganda#IndiaStandsTogetherpic.twitter.com/xy0c2wwjb3
— Ram Kadam - राम कदम (@ramkadam) February 9, 2021
दरम्यान, केंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनाला आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहानाने पाठिंबा देणारे ट्विट केले होते. त्यानंतर सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, अक्षय कुमार यासारख्या सेलिब्रिटजनी ट्विट करत तिला प्रत्युत्तर दिले होते. या सर्व सेलिब्रिटजच्या ट्विटमध्ये साधर्म्य दिसून येत असल्याने याची चौकशी करण्यात येणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे. यावरून भाजपा नेत्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
सेलिब्रिटींच्या ट्विटबद्दल काय म्हणाले अनिल देशमुख?
काल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत काँग्रेसच्या शिष्टमंडळाची ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सेलिब्रिटीजच्या ट्विटच्या चौकशी करण्याची मागणी केली होती. एकाच वेळी सेलिब्रिटीजने ट्विट करण्यामागचे कारण काय? त्यांच्यावर कुणाचा दबाव होता का? या सेलिब्रिटजचा बोलविता धनी कोण आहे? या सर्व प्रकाराची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे.
यावर अनिल देशमुख यांनी सांगितले की, ही बाब गंभीर आहे. त्याचा तपास झाला पाहिजे. याबाबतची जबाबदारी गुप्तचर खात्याला दिली आहे. तसेच, सर्व सेलिब्रिटीचे ट्विट एकसारखे कसे काय असू शकतात. त्यांच्यावर कुठला दबाव होता का? असा सवालही अनिल देशमुख यांनी उपस्थित केला. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकार शेतकरी आंदोलनाबाबत भारतीय सेलिब्रिटींनी केलेल्या ट्विटची चौकशी करण्याची शक्यता आहे.
"भारतरत्नांची चौकशी करणारे असे 'रत्न' देशात कुठेही सापडणार नाहीत", देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
भारतरत्नांची चौकशी करण्याची भाषा वापरताना शरम वाटली पाहिजे, अशा शब्दांत भाजपाचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. "भारतरत्नांची चौकशी करण्याची भाषा वापरताना शरम वाटली पाहिजे. खरे तर चौकशी करण्याची मागणी करणारे आणि ती मागणी मान्य करणारे यांच्या मानसिक स्थितीचीच चौकशी केली पाहिजे," असे ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेससह राज्य सरकारवर टीका केली आहे.
याचबरोबर, कुठे गेला मराठीबाणा? कुठे गेला महाराष्ट्रधर्म? असा सवाल करत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवरही निशाणा साधला आहे. तसेच, भारतरत्नांची चौकशी करणारे असे ‘रत्न’ देशात कुठेही सापडणार नाहीत. निषेध करावा तितका थोडा, असे म्हणत या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे केला आहे.
भारतरत्नांची चौकशी करण्याची भाषा वापरताना शरम वाटली पाहिजे.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 8, 2021
खरे तर चौकशी करण्याची मागणी करणारे आणि ती मागणी मान्य करणारे यांच्या मानसिक स्थितीचीच चौकशी केली पाहिजे.