आठवले, खोत, मेटे आणि जानकर ठरले युतीचे पोस्टर बॉईज
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 09:03 AM2019-03-24T09:03:09+5:302019-03-24T09:05:02+5:30
राजकारणात ''दिल्या-घेतल्या''शिवाय काही होत नाही असे म्हटले जाते. मतं मिळवण्यासाठी तुम्ही एखाद्या पक्षाला, गटाला किंवा व्यक्तीला जवळ करत असाल तर सत्तेवर आल्यावर त्या व्यक्तीला याची पुरेपूर किंमत द्यावी लागते.
पुणे : राजकारणात ''दिल्या-घेतल्या''शिवाय काही होत नाही असे म्हटले जाते. मतं मिळवण्यासाठी तुम्ही एखाद्या पक्षाला, गटाला किंवा व्यक्तीला जवळ करत असाल तर सत्तेवर आल्यावर त्या व्यक्तीला याची पुरेपूर किंमत द्यावी लागते. आजही लहान पक्षांना सोबत घेतल्यावर मोठे पक्षांनी त्यांना खुश ठेवण्यासाठी काही पदे देण्याची परंपरा खूप जुनी आहे नव्हे त्यांना ती द्यावीच लागते. पण यंदाच्या निवडणुकीत मात्र युतीने ही परंपरा मोडायची ठरवलेली दिसत आहे. शिवसेना-भाजपच्या युतीमध्ये आगामी लोकसभा निवडणूका बघता आरपीआयचे रामदास आठवले, रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत, शिवसंग्रामचे विनायक मेटे आणि रासपचे महादेव जानकर यांना स्वतःला आणि पक्षाला एकही जागा न मिळाल्याने चौघेही युतीचे पोस्टर बॉईज ठरले आहेत.
या चौघांपैकी आठवले यांच्यामुळे २०१४ साली दलित मतांचे मोठे दान युतीच्या पदरात पडले. सध्या केंद्रात मंत्री असून त्यांचा ईशान्य मुंबईच्या जागेवर डोळा होता. पण राज्याच्या मंत्रिमंडळात आरपीआयला स्थान देणार या आश्वासनाप्रमाणे ही मागणीही बारगळली. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीला मिळणारा प्रतिसाद बघता आठवले यांचे भाजपमधले एकंदर महत्वचं कमी झाले आहे. विनायक मेटे यांना सध्या शिवस्मारकाचे अध्यक्षपद दिले असून गेले साडेचार वर्षं त्या व्यतिरिक्त त्यांना काहीही मिळाले नव्हते. ऐन निवडणुकीच्या मोक्यावर त्यांच्या काही कार्यकर्त्यांना महामंडळावर घेऊन पदांचे शिंपण करण्यात आले. त्यामुळे दिलेले गोड मानून गप्प बसण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही.शिवाय मराठा आरक्षणाच्यावेळी मेटे यांच्यामुळे सरकारला फार मोठी मदत मिळाली नसल्याने त्यांनाही युतीत अपेक्षित महत्व नाही. सदाभाऊ खोत यांची अवस्था तर अधिक वाईट असून त्यांना बाहेर पडण्यास जागाच शिल्लक नाही. स्वाभिमानी महाआघाडीत सामील झाल्याने त्यांना ती दारे बंद आहेत. दुसरीकडे त्यांच्या रयत स्वाभिमानी पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याने त्यांची कोंडी झाली आहे. महादेव जानकर यांचीही परिस्थिती वेगळी नसून तेही युतीत मिळेल त्यात जमवून घेण्यास तयार आहे. शनिवारी पुण्यात झालेल्या रासपच्या मेळाव्यात त्यांनी दंड थोपटले खरे, मात्र काहीही करायची तयारी दाखवली तरी त्यांचे हे बंड थंड होण्यासाठीच असल्याचे त्यांनीच सूचित केले आहे.त्यामुळे जानकर कुठेही जाणार नाही हे सगळेच जाणून आहेत. यांच्यापैकी आठवले आणि जानकर यांनी निदान पुढे येत आम्हाला जागा लढवण्यात रस असल्याचे दाखवले होते. उर्वरित दोघे तर मूळ भाजपचे असल्यासारखे निवडणूक लढवण्याच्या इराद्यातही दिसून आले नाहीत. नेत्यांच्या अशा ऐनवेळी कचखाऊ धोरणामुळे कार्यकर्तेही नाराज होतात. मात्र सध्याच्या राजकारणात सर्वांत शेवटचा घटक कार्यकर्ता असल्यामुळे कोणालाही त्याचा फारसा फरक पडलेला दिसून येणार नाही.
असे असले तरी प्रत्यक्षात या चारही नेत्यांना फार काळ गृहीत धरून चालणार नाही याची युतीच्या नेत्यांना कल्पना आहे. विशेषतः महाआघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने लहान पक्षांना निदान एक ते दोन जागा सोडल्यामुळे युतीमध्ये उपद्रव वाढणार आहे. त्यामुळे लोकसभेत दुर्लक्ष केले तरी विधानसभेत मात्र त्यांना न्याय द्यावा लागेल. राजकारणात उद्याचं सांगणं कठीण झालेल्या काळात विधानसभेची शास्वती देणे सध्या तरी कठीण आहे. मात्र अशा परिस्थितीतसुद्धा या चारही नेत्यांनी सगळे समजून, उमजून आणि आहे त्यात धन्यता मानत पोस्टर बॉईज म्हणून राहण्याची तयारी दाखवल्याचे चित्र आहे.