दानवेंची जीभ घसरली; पुन्हा तीच चूक केली; जवानांना म्हणाले अतिरेकी!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 09:42 PM2019-04-05T21:42:24+5:302019-04-05T22:46:54+5:30
आपल्या देशाचे 42 अतिरेकी मारले गेल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला आहे.
औरंगाबाद- भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची वादग्रस्त विधानांची मालिका काही थांबत नाहीये. जालना लोकसभा मतदारसंघातील रामनगर येथे रावसाहेब दानवे प्रचार कार्यालयाच्या उद्धाटनासाठी आले होते. उद्धाटनानंतर उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी पुन्हा एकदा मागच्याच वादग्रस्त विधानाची री-ओढली आहे. आपल्या देशाचे 42 अतिरेकी मारले गेल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला आहे. रावसाहेब दानवेंनी पुन्हा एकदा जवानांना दहशतवादी संबोधले आहे. त्यामुळे रावसाहेब दानवेंना दहशतवादी आणि जवान यातील फरकच समजत नाही काय, असाही प्रश्न आता उपस्थित केला जातोय.
गेल्या काही दिवसांपूर्वीही पुलवामा हल्ल्यावर बोलताना ते म्हणाले होते की, पाकिस्तानने देशातील 40 अतिरेकी मारले. विशेष म्हणजे त्यांचा या वादग्रस्त विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, दानवेंनी शहीद जवानांचा अपमान केल्याची तीव्र भावना नेटकरी व्यक्त केली होती. या विधानावरून विरोधी पक्षांनीही दानवे लक्ष्य केलं. राष्ट्रवादी काँग्रेसने दानवेंचा याबाबतच व्हिडीओ शेअर करून त्यांना हेच का भाजपाचे बेगडी देशप्रेम? असा प्रश्न विचारला होता. सोलापुरातील हेरिटेज येथे महायुतीचा विजयी संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष दानवे बोलले होते की, आज देशामध्ये भयानक युद्धजन्य परिस्थिती आहे. केव्हा काय होईल हे सांगता येत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हातात आता देश सुरक्षित राहू शकतो, अशी तमाम देशवासीयांची भावना आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या आणि मोदींचे हात बळकट करा, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले. तर त्यानंतरही दानवेंनी वादग्रस्त विधानांची मालिका सुरूच ठेवली.जालन्यात केलेल्या एका विधानामुळे दानवे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. दानवे यांनी बोलता बोलता विंग कमांडर अभिनंदन याला हेलिकॉप्टरचा पायलट असं म्हटलं होतं. खरं तर अभिनंदन हे भारताच्या लढाऊ विमानांचे धडाकेबाज वैमानिक आहेत. या नव्या विधानानंतर दानवेंवर पुन्हा एकदा चहू बाजूंनी टीका होऊ लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी दानवेंर निशाणा साधला होता. धनंजय मुंडेंनी ट्विट करत म्हटलं आहे की, बे एके बे, बे दुने चार, बे त्रिक बेअक्कल. त्यानंतर त्यांनी 'येडं पेरलं आणि खुळं उगवलं' अशी भाजपाची सगळी गत झाल्याचीही टीका केली आहे. यांना विंग कमांडर आणि पायलट यातला फरक कळत नाही. मिग-२१ आणि हेलिकॉप्टर यातला फरक कळत नाही आणि झालेत प्रदेशाध्यक्ष, असंही ते म्हणाले होते.