“मंदिर-मशिदी निर्माणावर खर्च करण्यापेक्षा आरोग्य यंत्रणा सुधारण्याकडे लक्ष देणं गरजेचं”
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 07:14 PM2020-08-17T19:14:38+5:302020-08-17T19:16:41+5:30
शहरातील कमी होणारी रुग्णसंख्या, शिवाय धारावीसारख्या परिसरात मुंबई महापालिकेने केलेल्या कामाचं कौतुक WHO कडूनही केले गेले असंही किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
मुंबई – सध्या जगभरावर कोरोनाचं संकट आहे, मुंबईतही कोरोना महामारी आहे. या संकटातून सगळ्यांना एक धडा मिळाला आहे. मंदिर, मशिदी, चर्च, गुरुद्वारा यांच्या निर्माणासाठी जे पैसे खर्च केले जातात त्यापेक्षा आपल्याला आरोग्य यंत्रणा सुधारणा करण्याकडे लक्ष द्यायला हवं असं मत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मांडले आहे.
धार्मिक स्थळ गरजेचे असले तरी सध्या त्यापेक्षाही अधिक हॉस्पिटलचं, नर्सिंग होम उभे करणे आवश्यक आहे. मुंबईतील २४ वार्डापैकी २० वार्डात रुग्णवाढीचा दर १ टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. मुंबईत ज्या पद्धतीने कोरोना रुग्णवाढीने उच्चांक गाठला होता. आता हळूहळू हा दर निच्चांक होत आहे. मुंबईकर सोशल डिस्टेंसिंगच पालन उत्तमरित्या करत आहेत. मुंबई महापालिकेने 4T कॅम्पेन(Tracing, Testing, Treatment, Tracking) याची अंमलबजावणी केली. त्यानंतर कोरोनाचं हॉटस्पॉट असलेल्या वरळी कोळीवाडा, धारावी येथे सकारात्मक बदल दिसले, सध्या आम्ही मृतांचा आकडा कमी करण्यावर भर देत असल्याचं किशोरी पेडणेकर म्हणाल्या. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.
तसेच ऑक्सिजन, आयसीयू बेड्सची कमतरता होती, अनेक रुग्ण शेवटच्या क्षणाला रुग्णालयात पोहचत होते, मात्र त्यानंतर आम्ही जम्बो कोविड सेंटर उभारली जिथे ऑक्सिजन, आयसीयू बेड्स उपलब्ध केले. शहरातील कमी होणारी रुग्णसंख्या, शिवाय धारावीसारख्या परिसरात मुंबई महापालिकेने केलेल्या कामाचं कौतुक WHO कडूनही केले गेले असंही किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
दरम्यान, मी राजकारणात येण्यापूर्वी नर्स म्हणून जेएनपीटी येथे कार्यरत होते. माझ्या अनुभवाचा फायदा आता होत आहे. कोरोना संकटकाळात कसं लढायलं हवं, काय करायला हवं त्यासाठी मदत होते. मी स्वत: नायर हॉस्पिटलमध्ये २ दिवस नर्स म्हणून कोरोना काळात काम केले, पण त्यानंतर सरकारने ५५ वर्षांवरील कर्मचाऱ्यांना कोविड १९ ड्युटी लावण्यावर मनाई केल्यानंतर मी काम बंद केले. आताही कोणत्याही हॉस्पिटलमध्ये गरज भासेल तिथे माझी काम करण्याची तयारी आहे असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.