Sachin Vaze : "सचिन वाझेंमुळे 'मातोश्री' अडचणीत, त्यांच्या जीवाला धोका; तातडीने संरक्षण द्या, मुंबई पोलिसांपासून दूर ठेवा"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 11:43 AM2021-03-18T11:43:45+5:302021-03-18T11:58:27+5:30

Ravi Rana And Thackeray Government Over Sachin Vaze : आमदार रवी राणा यांनी सचिन वाझेंचाही हिरेन होईल, त्यांना तातडीने संरक्षण द्या अशी मागणी केली आहे.

Ravi Rana Slams Mumbai Police And Thackeray Government Over Sachin Vaze | Sachin Vaze : "सचिन वाझेंमुळे 'मातोश्री' अडचणीत, त्यांच्या जीवाला धोका; तातडीने संरक्षण द्या, मुंबई पोलिसांपासून दूर ठेवा"

Sachin Vaze : "सचिन वाझेंमुळे 'मातोश्री' अडचणीत, त्यांच्या जीवाला धोका; तातडीने संरक्षण द्या, मुंबई पोलिसांपासून दूर ठेवा"

Next

मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी, गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू (Mansukh Hiren Death Case) आणि त्यानंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना झालेली अटक या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेते गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. याच दरम्यान आता आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी सचिन वाझेंचाही हिरेन होईल, त्यांना तातडीने संरक्षण द्या अशी मागणी केली आहे. तसेच त्यांना मुंबई पोलिसांपासून दूर ठेवा असं देखील म्हटलं आहे. 

"सचिन वाझे यांचंही मनसुख हिरेनप्रमाणे होऊ शकतं, त्यांच्या जीवाला धोका आहे. सचिन वाझे यांच्यामुळे मातोश्री अडचणीत आली आहे. मुंबई पोलिसांपासून त्यांना दूर ठेवा असं रवी राणा यांनी म्हटलं आहे. तसेच आगामी काळात सचिन वाझे प्रकरणावरुन महाराष्ट्रात मोठा भूकंप होऊ शकतो. फक्त पोलीस आयुक्तांना दूर करून हे प्रकरण संपणार नाही. याचे धागेदोरे महाराष्ट्र सरकारच्या अवतीभवती फिरत आहेत. देवेंद्र फडणवीस मनसुख हिरेन यांना संरक्षण देण्याची मागणी करत होते. मात्र, त्यांचा खून झाला. त्याचप्रमाणे सचिन वाझे यांच्याही जीवाला आहे असं रवी राणा यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे. 

"हे ठाकरे सरकारचे पाप, दुर्दैवाने मुंबई पोलिसांचे एवढे खच्चीकरण आणि बदनामी कधीच झाली नव्हती"

मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी केली असून त्यांच्या जागी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची वर्णी लागली आहे. ठाकरे सरकारने हा मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ट्वीटवरून मिळत आहे. याच दरम्यान भाजपा नेत्यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. "दुर्दैवाने एवढे मुंबई पोलिसांचे खच्चीकरण आणि बदनामी कधीच झाली नव्हती. ठाकरे सरकारचे हे पाप आहे" असं म्हणत भाजपाचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. 

आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "एका सामान्य नागरिकाचा खून, एक एपीआयला अटक, त्याच्या गाडीत नोटांची बंडल, नोटा मोजण्याचे मशीन, गाडीत नंबर प्लेटचा  खच...त्यावरून मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या... दुर्दैवाने ऐवढे मुंबई पोलिसांचे खच्चीकरण आणि बदनामी कधीच झाली नव्हती. ठाकरे सरकारचे हे पाप आहे!" असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांचा तपास NIA कडून सुरु आहे, यातच NIA ने स्कॉर्पिओ, इनोव्हापाठोपाठ आता सचिन वाझे वापरत असलेली मर्सिडीज कारही जप्त केली आहे. या कारच्या डिक्कीतून 5 लाख रुपयांची रोकड आणि नोटा मोजायची मशीन सापडल्याने खळबळ उडाली. मात्र आता या कारवरून काँग्रेस आणि भाजपात जुंपल्याचं दिसून येत आहे. 

"महाराष्ट्र सरकार कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार करतंय"; अमृता फडणवीसांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांनीही या प्रकरणात उडी घेत ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अमृता फडणवीस यांनी सचिन वाझे अटक प्रकरणावरून ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. महाराष्ट्र सरकार कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार करत आहे असा गंभीर आरोप देखील अमृता यांनी केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "एकीकडे नागपूरसारख्या शहरामध्य कोरोनाबाधित रुग्णांना दाखल करण्यासाठी रुग्णालयांमध्ये जागा मिळत नाही आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकार कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार करत आहे. उद्योगपतींना घाबरवून त्यांच्याकडून वसुली करण्यासाठी सरकार आपल्या काही खास पंटराकडून योजना आखत आहे" असं अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

Read in English

Web Title: Ravi Rana Slams Mumbai Police And Thackeray Government Over Sachin Vaze

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.