रविशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकरांना पक्षात मिळणार मोठी जबाबदारी, लवकरच होणार घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 10:22 PM2021-07-11T22:22:54+5:302021-07-11T22:24:12+5:30
Ravi Shankar Prasad and Prakash Javadekar: मंत्रिमंडळातून बाहेर गेल्यानंतर आता पक्षातील ज्येष्ठ नेते असलेल्या रविशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकर यांना लवकरच पक्षामध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली जाणार आहे.
नवी दिल्ली - नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील विस्तारापूर्वी रविशंकर प्रसाद, हर्षवर्धन आणि प्रकाश जावडेकर यांच्यासह १२ मंत्र्यांनी आपल्या पदावरून राजीनामा दिला होता. दरम्यान, मंत्रिमंडळातून बाहेर गेल्यानंतर आता पक्षातील ज्येष्ठ नेते असलेल्या रविशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकर यांना लवकरच पक्षामध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली जाणार आहे. दोन्ही वरिष्ठ नेत्यांना पक्षामध्ये राष्ट्रीय सरचिटणीस किंवा राष्ट्रीय उपाध्यक्षपद दिले जाण्याची शक्यता आहे. तसेच पुढील काळात निवडणुका होत असलेल्या राज्यांचे प्रभारीपद या नेत्यांकडे सोपवले जाण्याची शक्यता आहे.
पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, रमेश पोखरियाल निशंक आणि हर्षवर्धन यांच्यासह राही अन्य नेत्यांचा पक्षाच्या संघटनेमध्ये समावेश करून त्यांना या राज्यांमध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली जाऊ शकते. रविशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकर यांनी आधीही पक्षसंघटनेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. निशंक उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आहेत. तर हर्षवर्धन यांनी भाजपाच्या दिल्ली प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती.
७ जुलै रोजी केंद्रीय मंत्रिमंडळात झालेल्या फेरबदलांमध्ये भाजपाचे सरचिटणीस भूपेंद्र यादव आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष अन्नपूर्णा देवी यांच्यासह पक्षसंघटनेत वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या पाच नेत्यांना मंत्रिपद देण्यात आले आहे. भाजपामध्ये एक व्यक्ती एक पद धोरण लागू आहे. त्यामुळे सरकारमध्ये सहभागी करण्यात आलेल्या नेत्यांच्या जागी संघटनेमध्ये नव्या लोकांना जबाबदारी दिली जाऊ शकते. रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर यांच्यासह मंत्रिमंडळातून नारळ देण्यात आलेल्या अन्य नेत्यांनाही पक्षसंघटनेमध्ये महत्त्वाची भूमिका दिली जाऊ शकते.