Cabinet Expansion: “डॉ. हर्षवर्धन यांचा राजीनामा म्हणजे विरोधकांचे आरोप योग्य असल्याचे सिद्ध!”
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 02:49 PM2021-07-09T14:49:12+5:302021-07-09T14:51:47+5:30
Cabinet Expansion: केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचा राजीनामा म्हणजे विरोधकांचे आरोप योग्य असल्याचे स्पष्ट होत असल्याचे म्हटले जात आहे.
नवी दिल्ली: मोदी सरकारचा दुसऱ्या कार्यकाळातील पहिला मंत्रिमंडळ विस्तारात ४३ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मोदी सरकारने काही नेत्यांना पदोन्नती तर काही मंत्र्यांना डच्चू दिला. डच्चू दिलेल्या मंत्र्यांमध्ये अनेक दिग्गज नावांचा समावेश आहे. मोदी सरकारने कामगिरीच्या आधारावर नवीन मंत्रिमंडळ गठीत केल्याची चर्चा आहे. यामध्ये रविशंकर प्रसाद, डॉ. हर्षवर्धन आणि प्रकाश जावडेकर यांच्या राजीनाम्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र, यावरून अद्यापही उलट-सुलट चर्चा सुरू असल्याचे दिसत आहे. यातच आता माजी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचा राजीनामा म्हणजे विरोधकांचे आरोप योग्य असल्याचे स्पष्ट होत असल्याचे म्हटले जात आहे. (ravish kumar react on modi cabinet expansion)
ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली असून, यामध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उहापोह केला आहे. रविशंकर प्रसाद यांचा राजीनामा घेणे काहीसे धक्कादायक होते. कारण ट्विटरसारख्या बड्या अमेरिकी कंपनीला ते थेटपणे भिडत होते. काही झाले, तरी कायदे पाळावे लागतील, असे निर्भिडपणे सांगत होते. मात्र, त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. रविशंकर प्रसाद यांना पदावर कायम ठेवले असते, तर अमेरिकेला एक स्पष्ट संदेश गेला असता की, मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्री कुणालाही घाबरत नाही.
डॉ. हर्षवर्धन यांचा राजीनामा योग्यच निर्णय
डॉ. हर्षवर्धन यांचा राजीनामा घेणे म्हणजे विरोधकांचे आरोप योग्य असल्याचे स्पष्ट होत असल्याचे रवीश कुमार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. केंद्र सरकारने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी कोणतीही तयारी केली नव्हती. अन्यथा लाखोंच्या संख्येत नागरिक मृत्युमुखी पडले नसते. या परिस्थितीला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली नाही. हे दुर्दैवी असून, हे केवळ भारतातच होऊ शकते. यामुळे जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा मलीन झाली. तर, दुसरीकडे पंतप्रधान मोदी स्वतः निवडणूक कार्यक्रमांमध्ये व्यस्त होते. लोकांना मरण्यासाठी सोडून दिले होते, अशी बोचरी टीका रवीश कुमार यांनी केली आहे.
दरम्यान, केंद्र सरकार प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरले आहे. शिक्षण क्षेत्राची परिस्थिती योग्य नाही. यावर पंतप्रधान मोदींनी हस्तक्षेप करणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. दुसरीकडे भारताची अर्थव्यवस्था ढासळली आहे. मात्र, अर्थमंत्री बदलले गेले असते, तर तो चुकीचा संदेश गेला असता, यासाठी तसे केले नाही, असा दावा रवीश कुमार यांनी केला आहे.