शिवरायांच्या जन्मभूमीत स्त्री सन्मान अन् अस्मितेसाठी स्वत:चं रक्तही द्यायला तयार; कंगना राणौत भडकली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 09:27 AM2020-09-09T09:27:45+5:302020-09-09T09:30:06+5:30

महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीत स्त्री सन्मान आणि अस्मितेसाठी स्वत:चं रक्तही द्यायला तयार आहे, जय महाराष्ट्र असं अभिनेत्री कंगना राणौतनं ट्विट केले आहे.

Ready to give blood for the honor and dignity of women Said Kangana Ranaut over Shiv Sena Dispute | शिवरायांच्या जन्मभूमीत स्त्री सन्मान अन् अस्मितेसाठी स्वत:चं रक्तही द्यायला तयार; कंगना राणौत भडकली

शिवरायांच्या जन्मभूमीत स्त्री सन्मान अन् अस्मितेसाठी स्वत:चं रक्तही द्यायला तयार; कंगना राणौत भडकली

Next
ठळक मुद्देमुंबईत माझं घर आहे. महाराष्ट्राने मला सगळंकाही दिले हे मला मान्यच आहे. माझे सगळे मित्र परतले पण मुंबादेवीने मला तिच्या जवळच ठेवलेकंगना राणौतनं ट्विटवरुन पुन्हा एकदा शिवसेनेवर नाव न घेता प्रहार

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आज मुंबईत येणार आहे. शिवसेनेशी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून कंगनाला वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे. त्यामुळे कंगनाच्या सुरक्षेसाठी १ किंवा २ कमांडोसह ११ सुरक्षा रक्षक तैनात असणार आहेत. सकाळी कंगना हिमाचल प्रदेशमधील मंडी येथून चंढिगड एअरपोर्टसाठी रवाना झाली आहे. दुपारी ती चंढिगडहून मुंबईसाठी फ्लाईटने येणार आहे.

तत्पूर्वी कंगना राणौतनं ट्विटवरुन पुन्हा एकदा शिवसेनेवर नाव न घेता प्रहार केला आहे. कंगनानं म्हटलं आहे की, मी वयाच्या १२ वर्षी हिमाचलसोडून चंढिगड येथे हॉस्टेलला गेली. तिथून दिल्लीत आली त्यानंतर १६ व्या वर्षी मुंबईत आली. काही मित्रांनी सांगितले मुंबईत तोच राहतो ज्याला मुंबादेवी ठेवते. आम्ही सगळे मुंबादेवीच्या दर्शनासाठी गेलो होतो. सर्व मित्र परतले पण मुंबादेवीने मला तिच्या जवळच ठेवले असं ती म्हणाली.

तसेच मुंबईत माझं घर आहे. महाराष्ट्राने मला सगळंकाही दिले हे मला मान्यच आहे. पण मीदेखील महाराष्ट्राला माझ्या भक्ती आणि प्रेमाने एक मुलगी म्हणून भेट दिली आहे. जी महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीत स्त्री सन्मान आणि अस्मितेसाठी स्वत:चं रक्तही द्यायला तयार आहे, जय महाराष्ट्र असं अभिनेत्री कंगना राणौतनं ट्विट केले आहे.

ना डरुंगी...ना झुकूंगी

राणी लक्ष्मीबाईचं धाडस, शौर्य आणि बलिदान मी सिनेमाच्या माध्यमातून जगले आहे. हे लोक मला माझ्या महाराष्ट्रात येण्यापासून रोखत आहेत याचं दु:ख आहे. मी राणी लक्ष्मीबाईच्या मार्गावर चालत आहे. मी कोणालाही घाबरणार नाही आणि झुकणारही नाही. चुकीच्या गोष्टींविरोधात सतत आवाज उचलत राहणार आहे, जय महाराष्ट्र, जय शिवाजी असंही कंगनानं ट्विटमधून शिवसेनेचं नाव न घेता बजावलं आहे.

सामनातून शिवसेनेने कंगनावर केली टीका   

मुंबई कुणाची? हा प्रश्नच कुणी विचारू नये. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहेच पण देशाचे सर्वात मोठे आर्थिक उलाढालीचे केंद्र आहे. याच मुंबईसाठी १०६ मराठी माणसांनी बलिदान दिले आहे. त्यामुळे मुंबई महाराष्टाचीच आहे. ती मुंबईत इमानाने राहणाऱ्या सर्वांची आहे. कारण ती भारताची आहे. पण ती आधी छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राची आहे. म्हणूनच ती भारताची आहे. त्यामुळे मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणे आणि मुंबई पोलिसांना माफिया वगैरे हिणवून खाकी वर्दीचा अवमान करणे हे बिघडलेल्या मानसिकतेचे लक्षण आहे, अशी टीका सामनामधून कंगनावर करण्यात आली आहे.


तसेच मुंबईवर हक्क सांगण्यास यानिमित्ताने बरेच जण पुढे आले आहेत. मुंबई हा मुंबाई देवीचाच प्रसाद आहे. मुंबई किंवा मुंबादेवी ही कोळी लोकांची कुलस्वामिनी आहे. मुंग नावाच्या कोळी पुरुषाने ही देवी स्थापन केली त्याला मुंगाची आई म्हणू लागले. तर महा-अंबाआई या नावातूनच मुंबाई हे सोपे नाव त्या देवीला मिळाले. कोणी म्हणतात मृण्मयीचेच मुंबई हे रुप आहे. अशा देवीस्वरुप आईची तुलना पाकव्याप्त भागाशी करुन आमच्या देवीचाच अपमान केला. हिंदुत्वाचा आणि संस्कृतीचा, धर्माचा आणि १०६ हुतात्म्यांच्या त्यागाचाच अवमान केला असं सांगत शिवसेनेने भाजपा आणि कंगना राणौतवर टीकास्त्र सोडलं आहे.

कंगनाला Y दर्जाची सुरक्षा

मुंबई पोलिसांसंदर्भातील वक्तव्य आणि त्यावरून सुरू झालेल्या वादानंतर आता, केंद्र सरकारने कंगनाच्या संरक्षणात वाढ केली आहे. आता कंगनाला Y दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी कंगना रणौतने मुंबई पोलिसांवर अविश्वास व्यक्त केला होता. यानंतर तिला मुंबईत येण्यासंदर्भात धमक्या दिल्या गेल्या होत्या. यासंर्व पार्श्वभूमीवर कंगनाच्या वडिलांनी हिमाचल पोलिसांकडे कंगनाच्या सुरक्षिततेसंदर्भात मागणी केली होती. कंगना ९ सप्टेंबरला म्हणजे आज मुंबईत येणार आहे. हिंमत असेल तर मला अडवून दाखवा, असे थेट आव्हान तिने शिवसेनेला दिले आहे.

Web Title: Ready to give blood for the honor and dignity of women Said Kangana Ranaut over Shiv Sena Dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.