मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाने नाणार बाधित जमिनीत कमिशन घेतले; निलेश राणेंचा गंभीर आरोप
By मोरेश्वर येरम | Published: January 21, 2021 01:58 PM2021-01-21T13:58:50+5:302021-01-21T14:06:51+5:30
"नाणार प्रकल्पात बाधित जमिनीचे मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाने कमिशन घेतले आहे", असा खळबळजक आरोप निलेश यांनी यांनी केला आहे.
कोकणातील बहुचर्चित आणि वादग्रस्त नाणार प्रकल्पावरुन भाजपचे नेते निलेश राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. "नाणार प्रकल्पात बाधित जमिनीचे मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाने कमिशन घेतले आहे", असा खळबळजक आरोप निलेश यांनी यांनी केला आहे.
नाणार प्रकल्पाला शिवसेनेनं विरोध केला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यावर नाणार प्रकल्पाला स्थगिती देण्यात आली. पण आता नाणार प्रकल्प पुन्हा एकदा कोकणातच सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्याच्या चर्चेनं जोर धरला आहे. यावरुनच निलेश राणे यांनी ट्विट करत नाणार प्रकल्प शंभर टक्के कोकणातच पुन्हा एकदा आणला जाणार असा दावा केला आहे.
"१०० टक्के नाणार प्रकल्प राजापूर तालुक्यात आहे तिथेच राहणार. खासदार विन्या राऊतला कोण विचारतं?? मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाने बाधित जमिनीमध्ये कमिशन घेतले आहे व खरेदी केलेली आहे म्हणून काही करून मुख्यमंत्री आहे त्याच जागेवर प्रकल्प ठेवणार...पडद्याआड सगळं ठरलं आहे", असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.
निलेश राणे यांच्या ट्विटने आता मोठा गदारोळ होण्याची शक्यता आहे. कारण थेट मुख्यमंत्र्यांवर आरोप केल्यानं हे प्रकरण चिघळण्याची दाट शक्यता आहे.
प्रमोद जठारांनीही केला होता आरोप
नाणार रिफायनरीला विरोध असल्याचे आणि ती होणार नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इथे येऊन सांगून गेले. पण याच ठाकरे बंधुंच्या नातेवाईकांनी नाणारला लागणारी जमिन खरेदी केली आहे, हिंमत असेल तर पाहायला या पुरावे दाखवतो, असा गंभीर आरोप भाजपचे माजी आमदार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी याआधी केला होता. या आरोपातून जठार यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचेही अप्रत्यक्षपणे नाव घेतले होते.