Remdesivir Issue: रेमडेसिविरच्या साठ्यावरून सत्ताधारी-विरोधकांत खडाजंगी; सोशल मीडियातही तीव्र पडसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 06:17 AM2021-04-19T06:17:17+5:302021-04-19T06:22:35+5:30

मुंबई पोलिसांनी शनिवारी रात्री ब्रुक फार्मा कंपनीच्या राजेश डोकानिया यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्यापासून या वादाला सुरूवात झाली. दमण येथील या कंपनीने महाराष्ट्रासाठी भाजपला ५० हजार रेमडेसिवीर देण्याचे कबूल केले होते.

Remdesivir Issue: A rift between the ruling party and the opposition over Remdesivir's stock | Remdesivir Issue: रेमडेसिविरच्या साठ्यावरून सत्ताधारी-विरोधकांत खडाजंगी; सोशल मीडियातही तीव्र पडसाद

Remdesivir Issue: रेमडेसिविरच्या साठ्यावरून सत्ताधारी-विरोधकांत खडाजंगी; सोशल मीडियातही तीव्र पडसाद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : कोरोनाने राज्यात हाहाकार उडविलेला असताना शनिवारी रात्रीपासून राज्यात रेमडेसिविर इंजेक्शनच्या निमित्ताने सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. सत्ताधारी पुरवठादारांवर दबाव टाकत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. तर, भाजप नेते पोलिसांवर दबाव टाकून साठेबाजांना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा प्रत्यारोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. 


या संघर्षाचे तीव्र पडसाद समाजमाध्यमांतही उमटले. थेट देशपातळीवरील नेते, पाठिराख्यांनी दावे-प्रतिदावे करत छेडलेल्या तुंबळ लढाईमुळे रविवारी सायंकाळपर्यंत अक्षरशः लाखो टि्वटस, पोस्टचा खच सोशल मीडियावर पडला.
मुंबई पोलिसांनी शनिवारी रात्री ब्रुक फार्मा कंपनीच्या राजेश डोकानिया यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्यापासून या वादाला सुरूवात झाली. दमण येथील या कंपनीने महाराष्ट्रासाठी भाजपला ५० हजार रेमडेसिवीर देण्याचे कबूल केले होते. या कंपनीच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, पराग अळवणी आदी नेत्यांनी मध्यरात्री पोलिस स्थानकात धाव घेतली. यावेळी फडणवीस यांनी पोलिसांना धारेवर धरत  अशाप्रकारे अटकेची कारवाई करता येषार नाही, असे सांगितले.  


राज्यातील तुटवडा लक्षात घेत रेमडेसिविर आणायला मदत करत असताना आडकाठी केली जात आहे, हे इंजेक्शन आम्ही राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून राज्याच्या जनतेला देणार होतो. अन्न व प्रशासन मंत्र्यांना तशी माहिती दिली होती. आवश्यक परवानग्या मिळवून दिल्या. मात्र संकटकाळात महाविकास आघाडी सरकारला राजकारण सुचत असल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला.
तर रात्रीच्या वेळी पोलिस स्टेशनमध्ये दोन विरोधी पक्षनेते आणि दोन आमदार साठेबाजाला वाचवण्यासाठी जातात यात काहीतरी काळंबेरं आहे. राज्यातील भाजप वकिली करण्यासाठी का जातेय याची उत्तरे मिळायला हवीत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री  केली आहे. 
एका व्यावसायिकासाठी भाजप नेते मुंबई पोलिसांवर दबाव टाकत आहेत. रेमडेसीवीरच्या ६०.हजार इंजेक्शनचा मोठा साठा ब्रूक लॅबोरेटरीजच्या निर्यातदारांकडे लपवल्याची माहिती मुंबई पोलिसांकडे होती, असा दावा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. 
दरम्यान, राज्य सरकारला, स्थानिक अधिकाऱ्यांना आणि पोलिसांना माहिती न देता रेमडेसिविरसारखे औषध भाजपवाले कसे खरेदी करु शकतात? नवीन कायदा आला आहे का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. साठेबाजाला चौकशीला बोलावून दोन तास चौकशी केल्याबद्दल पाटील यांनी पोलिसांचे कौतुकही केले. 

हा तर पोलिसांच्या कामात हस्तक्षेप 
 पोलीस ठाण्यात जाऊन त्यांच्याशी वाद घालणे हा पोलिसांच्या कामात हस्तक्षेप आहे. असे प्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत. एखाद्या प्रकरणात पोलिसांना चौकशी करावीशी वाटली तर पोलीस कोणालाही चौकशीसाठी बोलावू शकतात. पोलिसांवर दबाव टाकणे योग्य नाही.
    - दिलीप वळसे-पाटील, गृहमंत्री

राज्य सरकारला माहिती न देता खरेदी कशी ? 
राज्य सरकारला, स्थानिक अधिकाऱ्यांना आणि पोलिसांना माहिती न देता लोकांचे प्राण वाचवणारे रेमडेसिविरसारखं औषध भाजपवाले कसे खरेदी करु शकतात? नवीन कायदा आला आहे का? या प्रकरणात संबंधितांची चौकशी करीत पोलिसांनी त्यांचे काम चोखपणे पार पाडलं आहे 
    - जयंत पाटील, जलसंपदामंत्री 

विरोधकांनी दिल्लीत लॉबिंग केले तर बरे होईल
कोरोनाच्या संकटात राजकारण नको, हीच सगळ्यांची अपेक्षा आहे. मात्र, दुर्दैवाने तसे घडत नाही. राज्यातील दोन्ही विरोधी पक्षनेते दिल्लीला गेले असते, तर तेथून ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शनची महाराष्ट्राला खूप मदत झाली असती, परंतु कुणी फार्मा कंपनीवाला कार्यकर्ता आहे, म्हणून विरोधी पक्षनेत्यांनी पोलीस ठाणे गाठणे योग्य नाही.     - बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री 

मंत्र्यांच्या ओएसडीची कंपनी मालकास धमकी
भाजपच्या नेत्यांना इंजेक्शन्स दिली म्हणून कारवाई होऊ शकत नाही. आमच्याकडे अन्न व औषध प्रशासानाची  यासाठी हवी असलेली परवानगी होती. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्याच्या ओएसडीने राजेश डोकानिया यांना फोन करुन धमकी दिल्याचाही पुरावा आमच्याकडे आहे. 
    - देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

Web Title: Remdesivir Issue: A rift between the ruling party and the opposition over Remdesivir's stock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.