२८२ जागांचे निकाल नवीन मतदारांच्या हाती युवकांना तोंडभरून आश्वासने; राजकीय पक्षांमध्ये चुरस
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 06:18 AM2019-03-05T06:18:08+5:302019-03-05T06:18:21+5:30
वयाची १८ वर्षे पूर्ण केलेले व लोकसभा निवडणुकांत पहिल्यांदाच मतदान करणार असलेले युवा मतदार २८२ मतदारसंघांमधील निकालांना कलाटणी देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
नवी दिल्ली : वयाची १८ वर्षे पूर्ण केलेले व लोकसभा निवडणुकांत पहिल्यांदाच मतदान करणार असलेले युवा मतदार २८२ मतदारसंघांमधील निकालांना कलाटणी देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
निवडणूक आयोगाच्या एका दस्तावेजात याची माहिती देण्यात आली आहे. सन १९९७ ते २००१ या कालावधीत जन्माला आलेले गेल्या लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी पात्र नव्हते. आगामी निवडणुकांत प्रत्येक लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदा मतदान करणारे सरासरी १ लाख ४९ हजार नवमतदार असणार आहेत. गेल्या, २०१४च्या लोकसभा निवडणुकांत २९७ मतदारसंघांत उमेदवार ज्या मताधिक्याने निवडून आले त्यापेक्षा हा आकडा मोठा आहे.
यातील हजारो मतदारांना २०१४ पासून झालेल्या विधानसभा निवडणुकांत मतदान करण्याची संधी मिळाली असण्याची शक्यता आहे. तरी हे सर्व नवमतदार पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकांसाठी मतदान करतील. त्यांना आपल्याकडे वळविण्यासाठी भाजपा व काँग्रेस दोघांचेही शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. देशात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करण्यापासून ते युवकांना शिक्षणापासून अनेक गोष्टींची संधी मिळवून देण्यापर्यंतची आश्वासने हे व अन्य पक्षही देत आहेत.
राज्यनिहाय वर्गवारी
नवे युवक मतदार ज्या २८२ मतदारसंघांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील त्यातील २१७ हे १२ प्रमुख राज्यांतील आहेत. पश्चिम बंगाल (३२ जागा), बिहार (२९), कर्नाटक (२०), तामिळनाडू (२०), राजस्थान (१७), केरळ (१७), झारखंड (१३), आंध्र प्रदेश (१२), महाराष्ट्र (१२), मध्य प्रदेश (११), आसाम (१०) अशी त्यांची वर्गवारी आहे.