घंटा बडवा, थाळ्या वाजवा, इतकेच तुमचे हिंदुत्व, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2020 07:52 AM2020-10-26T07:52:32+5:302020-10-26T07:53:26+5:30
Uddhav Thackeray : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा शिवाजी पार्कजवळील सावरकर राष्ट्रीय स्मारकात घेण्यात आला. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतरचा हा पहिला दसरा मेळावा होता.
मुंबई - मंदिर आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी भाजपचा खरपूस समाचार
घेतला. माय मरो पण गाय वाचो, असं आमचं हिंदुत्व नाही. इथं गोमाता आणि शेजारच्या गोव्यात खाता. असं आमचं हिंदुत्व नाही. पण
घंटा बडवा, थाळ्या वाजवा इतकंच तुमचं हिंदुत्व आहे. फक्त काळ्या टोप्या घालू नका, त्याखाली मेंदू असेल तर विचार करा, असा हल्लाबोल ठाकरे यांनी केला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा शिवाजी पार्कजवळील सावरकर राष्ट्रीय स्मारकात घेण्यात आला. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपद
स्वीकारल्यानंतरचा हा पहिला दसरा मेळावा होता. शिवाय, कोरोनासह राज्यात विविध मुद्यांवरून सरू असलेल्या राजकी्य घमासानाबाबत ठाकरे काय भूमिका घेतात, याबाबत उत्सुकता होती. राज्यपाल-मुख्यमंत्री संघर्ष, जीएसटी, बिहारचं राजकारण, सुशांतसिंह मृत्यू प्रकरण, कंगना रनौतवरून
निर्माण झालेला वादंग अशा विविध मुद्द्यांवर त्यांनी अत्यंत आक्रमक शैलीत समाचार घेतला. तर, मराठा, धनगर, ओबीसी आरक्षणाबाबतही नागरिकांना
आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला.
मोहन भागवत यांनी नागपुरातील आपल भाषणात हिंदुत्वाबाबत भ्रम निर्माण केला जात आहे, पूजा अर्चेपुरता हिंदूधर्म सिमीत नाही, राजकीय विरोधक म्हणजे शत्रू नाहीत. त्यामुळे राजकारणात विवेक बाळगावा. असे विचार मांडले. तोच धागा पकडत ठाकरे म्हणाले, संघाची राजकीय संघटना असलेल्या भाजप आणि काळी टोपी घालणा-यांनी तरी तो विचार समजून घ्यायला हवा. शिवसेनाप्रमुखांनी जे हिंदुत्व आम्हाला सांगितले तिच विचार आज
सरसंघचालक मांडत आहेत. त्यामुळे काळ्या टोपीखाली मेंदू असेल तर विचार करावा आणि त्यानंतरच तुम्ही सेक्युलर झालात का, वगैरे खर्डेघाशी
करावी, असा टोला मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांचे नाव न घेता लगावला.
नितीश कुमारांनी हिंदुत्वाची लस घेतली का?
एनडीएतून सगळे बाहेर पडले. महाराष्ट्रात फक्त शिवसेनेविरोधात एका नवख्या पक्षाचे उेमदवार उभे केले गेले. तसाच डाव बिहारात
खेळला जात आहे. नितीश कुमार यांनी सावध व्हायला हवे. नितीश कुमारच मुख्यमंत्री असतील, असं भाजपावाले आता म्हणताहेत. आता कुमारांनी
हिंदुत्वाची लस घेतली की भाजप सेक्युलर झाली, असा प्रश्न ठाकरे यांनी केला.