"नितीश कुमारांची खुर्ची जाणार, १५ ऑगस्टला तेजस्वी यादव तिरंगा फडकवणार", आमदाराच्या विधानाने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 04:18 PM2021-07-28T16:18:43+5:302021-07-28T16:19:57+5:30
Nitish Kumar Government in Bihar: एकीकडे भाजपाने आपली सत्ता असलेल्या राज्यांमध्ये मुख्यमंत्री बदलण्याचा धडाका लावला आहे. तर दुसरीकडे भाजपा आणि जनता दल युनायटेड आघाडीचे सरकार असलेल्या बिहारमध्ये भाजपाची सत्ता धोक्यात येण्याची शक्यता आहे.
पाटणा - एकीकडे भाजपाने आपली सत्ता असलेल्या राज्यांमध्ये मुख्यमंत्री बदलण्याचा धडाका लावला आहे. तर दुसरीकडे भाजपा आणि जनता दल युनायटेड आघाडीचे सरकार असलेल्या बिहारमध्ये भाजपाची सत्ता धोक्यात येण्याची शक्यता आहे. येथे राष्ट्रीय जनता दलाच्या (RJD) एका आमदाराने केलेल्या वक्तव्यामुळे बिहारमधल राजकारणात खळबळ उडाली आहे. (RJD MLA Bhai Virendra Says, Nitish Kumar to step down & Tejashwi Yadav will hoist the flag as CM on 15 august)
येत्या १५ ऑगस्ट रोजी तेजस्वी यादव हे मुख्यमंत्री बनून गांधी मैदानात तिरंगा फडकवतील, असे विधान राष्ट्रीय जनता दलाचे आमदार भाई वीरेंद्र यांनी केले आहे. एकीकडे बिहारमध्ये सत्तेत असलेल्या एनडीएमधील जनता दल युनायटेड, भाजपा, हम आणि व्हीआयपी या घटक पक्षांमध्ये एकमत दिसत नसतानाच आता भाई वीरेंद्र यांच्या विधानाने एनडीएमध्ये अधिकच चलबिचल होण्याची शक्यता आहे.
आरजेडीचे आमदार भाई वीरेंद्र यांनी एनडीएमध्ये सुरू असलेल्या घडामोडींचा उल्लेख खेला असा केला आहे. या खेलामुळे बिहारच्या राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. नितीश कुमार यांचे सरकार पडार आहे. तसेच स्वातंत्र दिनी १५ ऑगस्ट रोजी तेजस्वी यादव हे मुख्यमंत्री बनून तिरंगा फडकवणार आहेत, असा दावा त्यांनी केला आहे.
सध्या बिहारमध्ये जातीय जनगणनेवरून जेडीयू आणि भाजपा आमने-सामने आलेले आहेत. तर व्हीआयपीचे मुकेश सहानी हे सुद्धा भाजपावर नाराज आहेत. मुकेश सहानी यांनी उत्तर प्रदेशमध्ये फुलन देवी यांची मूर्ती स्थापन करायची होती. तसेच येत्या उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीमध्येही अधिकाधिक उमेदवार उभे करून अधिकाधिक जागा जिंकण्याचा दावा त्यांनी केला आहे.
दरम्यान, सोमवारी झालेल्या एनडीएच्या बैठकीलाही मुकेश सहानी अनुपस्थित होते. मात्र मंगळवारी त्यांचा पवित्रा काहीसा मवाळ झाला होता. त्यांनी नितीश कुमार सरकारबाबत आपली काहीही नाराजी नसल्याचे सांगितले होते. तसेच एनडीएबाबत ज्या काही समस्या आहेत त्याही दूर केल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले होते.
बिहारमधील या राजकीय घडामोडींदरम्यान, हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि बिहार सरकारमधील कॅबिनेट मंत्री शाहनवाझ हुसेन यांची भेट घेतली होती. या दोघांदरम्यान, दीर्घकाळ चर्चा झाली होती. मात्र बिहारमधील हम आणि व्हीआयपी हे दोन छोटे पक्ष नितीश कुमार यांच्या सरकारचा टेकू काढून घेतात की सरकारसोबत राहतात, हे पाहावे लागेल.