पार्थ यांना मिळालेल्या उमेदवारीवर रोहित पवार म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 06:48 AM2019-03-13T06:48:13+5:302019-03-13T06:48:51+5:30
पार्थ पवार यांच्या उमेदवारीवर रोहित पवारांचं भाष्य
पुणे : ‘पार्थ पवार यांच्या मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबद्दल मला काहीच म्हणायचे नाही; मात्र त्यांना कष्ट करावे लागतील, लोकांमध्ये जावे लागेल, संवाद साधावा लागेल, मेहनत करावी लागेल. निवडणूक सोपी नाही,’ असे मत जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
पवारसाहेबांनी पार्थसाठी माघार घेतली, या काही जणांनी केलेल्या वक्तव्यावर मात्र आपली हरकत आहे, असे स्पष्ट करून ते म्हणाले, ‘पवार साहेब गेली ५० वर्षे राजकारणात आहेत. लोकांचे ऐकूनच त्यांनी निर्णय घेतला असणार. मात्र एक नातू म्हणून व कार्यकर्ता म्हणूनही त्यांनी निवडणूक लढवावी असेच मला वाटते. त्यांच्यापासून शिकण्यासारखे बरेच काही आहे. माघार घेतली असे त्यांच्या इतक्या वर्षांच्या राजकारणात कधीही झालेले नाही. या वेळीही तसे झालेले नाही याची मला खात्री आहे. पार्थसाठी मावळमधील कार्यकर्ते आग्रही होते. राजकारणात शेवटी लोकांचे ऐकावेच लागते, तसे पवारसाहेबांनी ऐकले एवढेच यात झाले आहे. मात्र, माझ्यासह अनेक कार्यकर्त्यांची मागणी अशीच आहे, की साहेबांनी त्यांच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा.
शरद पवार यांची माढा मतदारसंघातून नातू पार्थ याच्यासाठी माघार अशी टीका होऊ लागल्याने रोहित पवार यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकून आपले मत व्यक्त केले होते. त्यावर सातत्याने दिवसभर प्रतिक्रिया येत होत्या. आपले ते म्हणणे पवार साहेबांबद्दलच्या आदरातूनच आले होते, असे रोहित यांनी सांगितले. साहेबांच्या कोणत्याही कृतीला काहीतरी अर्थ असतो. त्याचे अनेक पदर असतात, पण त्याचा अभ्यास न करता टीका केली जाते, असे ते म्हणाले. राज्याचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या सहवासातून सुरू झालेला साहेबांचा राजकीय प्रवास भेदभावाचे, जातीधर्माचे राजकारण न करता गेली ५२ वर्षे न थकता सुरू आहे. त्यांचे राजकारण कसल्या हवेवर नाही तर सर्वसामान्यांच्या घरातून सुरू होते, असे रोहित म्हणाले.
मान देणारे राजकारणच साहेब करत आलेत...
साहेबांच्या राजकारणावर टीका होते, त्यापेक्षा त्यांच्या राजकारणाला मान देणारे अनेकजण आहेत, असे सांगून पवार म्हणाले, सामान्यांच्या म्हणण्याला मान देणारे राजकारणच आतापर्यंत साहेब करत आले आहेत. त्यामुळे पार्थ यांच्यासाठी मागणी करणाऱ्यांच्या मताला त्यांनी मान दिला.
विधानसभेची निवडणूक लढविण्यासंदर्भात रोहित यांनी अनुकूलता दर्शविली. ते म्हणाले की, ज्या भागात माझे नाते निर्माण झाले आहे, तेथील जनतेची इच्छा असल्यास मी विधानसभा लढविण्याचा विचार नक्की करेन.