रोहित पवारांकडून नरेंद्र मोदींचे कौतुक, राज्यातील भाजपा नेत्यांना 'ही' जाणीव करुन देण्याची मागणी
By ravalnath.patil | Published: November 22, 2020 01:18 PM2020-11-22T13:18:16+5:302020-11-22T13:19:09+5:30
Rohit Pawar : 'गेल्या काही वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देशाने सौर ऊर्जा, इथेनॉल यासारख्या क्षेत्रांत केलेलं काम हे निश्चितच उल्लेखनीय आहे.'
मुंबई : गेल्या काही वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने सौर ऊर्जा, इथेनॉल यासारख्या क्षेत्रात केलेले काम हे निश्चितच उल्लेखनीय आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारचे कौतुक केले आहे. मात्र, याचवेळी कोरोनावरून राज्य सरकारवर टीका करणाऱ्या राज्यातील भाजपा नेत्यांवरही रोहित पवार यांनी निशाणा साधला आहे.
रोहित पवार यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. ते म्हणाले, "गेल्या काही वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देशाने सौर ऊर्जा, इथेनॉल यासारख्या क्षेत्रांत केलेलं काम हे निश्चितच उल्लेखनीय आहे. याबाबत केंद्र सरकारचं कौतुक करायलाच हवं. देशातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठीही असंच काम होईल, असा विश्वास आहे."
याचबरोबर, दुसरे ट्विट करत रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत राज्य सरकारवर टीका करणाऱ्या राज्यातील भाजपा नेत्यांना कोरोनाची जाणीव करुन देण्याची मागणी केली. ते म्हणाले, "कोरोना हे दुसऱ्या महायुद्धानंतरचे जगापुढचे सर्वात मोठे आव्हान असून याविरोधात निर्णायक कृती करण्याचं आवाहन मोदीजींनी जी २० परिषदेत जागतिक नेत्यांना केल्याने आनंद वाटला. त्यांनी या संकटाची जाणीव भाजपाच्या राज्यातील नेत्यांनाही करुन दिली तर ते या संकटाचा राजकीय खेळ थांबवतील."
तसंच कोरोना हे दुसऱ्या महायुद्धानंतरचं जगापुढचं सर्वात मोठं आव्हान असून याविरोधात निर्णायक कृती करण्याचं आवाहन मोदीजींनी #G20Summit परिषदेत जागतिक नेत्यांना केल्याने आनंद वाटला.त्यांनी या संकटाची जाणीव भाजपच्या राज्यातील नेत्यांनाही करुन दिली तर ते या संकटाचा राजकीय खेळ थांबवतील pic.twitter.com/qVKZikUKpJ
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 22, 2020
राज्यात १७ लाख ७४ हजार ४५५ कोरोनाचे रुग्ण
राज्यात शनिवारी दिवसभरात कोरोनाच्या ५ हजार ७६० रुग्णांचे निदान झाले असून ६२ मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, कोरोनाबाधितांची एकूण संख्या १७ लाख ७४ हजार ४५५ झाली असून बळींचा आकडा ४६ हजार ५७३ झाला आहे. दिवसभरात ४ हजार ८८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, आतापर्यंत १६ लाख ४७ हजार ४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.८२ टक्क्यांवर पोहोचले आहे.