"रोहित पवार, रोहित पाटील, टोपेंसह ५० उमेदवारांना पाडणार", लक्ष्मण हाकेंची यादी तयार!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 12:06 PM2024-10-02T12:06:49+5:302024-10-02T12:11:25+5:30
laxman hake Maharashtra Vidhan Sabha Election : मनोज जरांगे पाटील यांच्या पाठोपाठ ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनीही विधानसभा निवडणुकीसाठी बाह्या खोचल्या आहेत. रोहित पवार, रोहित पाटील, राजेश टोपेंसह ५० उमेदवारांना पाडणार, अशी घोषणा लक्ष्मण हाकेंनी केली.
Maharashtra Elections 2024: विधानसभा निवडणुकीत महायुतीबरोबरच आता ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनीही रोहित पवार, रोहित पाटील, राजेश टोपेंसह ५० उमेदवारांचे टेन्शन वाढवले आहे. लक्ष्मण हाकेंनी यांनी जाहीर केले की, मनोज जरांगे यांना मदत करणाऱ्या ५० नेत्यांना विधानसभा निवडणुकीत पाडणार आहे. त्यांना पाडण्यासाठीचा कृती कार्यक्रमही हाकेंनी सांगितला.
शरद पवार, शिंदे, ठाकरे, भाजपा नेत्यांना ओबीसींची भीती कधी बसणार?
माध्यमांशी बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की, "दुय्यम वागणूक ओबीसींना पक्षाकडून दिली जाते. ओबीसींना विनंती आहे की, पुढे या आणि नेतृत्व करा. ५० ते ६० टक्के ओबीसींची लोकसंख्या आहे, त्यांची भीती शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण यांना कधी बसणार आहे. एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, भाजपाचे नेते यांना ओबीसी मतांची भीती कधी बसणार आहे?", असा सवाल त्यांनी केला.
"ओबीसी आरक्षणावर या नेत्यांची अधिकृत भूमिका काय आहे? याचे उत्तर जोपर्यंत ही माणसं देणार नाही, तोपर्यंत या महाराष्ट्रातील ओबीसी या सर्व नेतृत्वांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जाब विचारेल", असे हाके म्हणाले.
लक्ष्मण हाकेंची घोषणा, '५० उमेदवारांना पाडणार'
या पत्रकार परिषदेत लक्ष्मण हाकेंनी ५० उमेदवारांना पाडण्याचे जाहीर केले. ते म्हणाले, "कोणत्या ५० उमेदवारांना पाडायचे, हे आमचे ठरले आहे. कारण या नेत्यांनी जरांगेंचं आंदोलन पाळलं, पोसलं, जरांगेंना डिझेल पुरवले, जरांगेंना पैसे पुरवले. जरांगेंना गाड्या पुरवल्या. जरांगेंना लेखी पाठिंबा दिला. त्या माणसांना ओबीसींनी का मतदान करायचे?, असा प्रश्न हाकेंनी उपस्थित केला.
५० उमेदवारांना पाडण्यासाठी काय करणार?
"50 उमेदवारांची यादी आमच्याकडे तयार आहे. त्या ५० मतदारसंघात आम्ही जाणार. सभा घेणार, आमची संघर्ष यात्रा निघणार. मग तो राजेश टोपे असो की, रोहित पवार. मग तो स्वर्गीय आर.आर. आबांचा मतदारसंघ असो किंवा आमच्या सांगली जिल्ह्यातील जतचा मतदारसंघ. नांदेड जिल्ह्यातील मतदारसंघ असो किंवा परभणी जिल्ह्यातील मतदारसंघ. ज्या ५० उमेदवारांना पाडायचे आहे, त्यांची आम्ही यादी बनवली आहे", असे लक्ष्मण हाके यांनी सांगितले.