रोहित पवारांकडून केंद्र सरकारच्या ‘या’ निर्णयाचं स्वागत; समान संधी देण्याची नरेंद्र मोदींकडे विनंती
By प्रविण मरगळे | Published: January 7, 2021 12:05 PM2021-01-07T12:05:34+5:302021-01-07T12:08:52+5:30
या अंतर्गत भारत आणि जपान यांच्यात सहकार्य आणि भागीदारी असलेली संस्थात्मक यंत्रणा उभी राहील
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात, केंद्र असो वा राज्य सरकारच्या निर्णयावर ते भाष्य करत असतात, अनेकदा केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांवरून रोहित पवारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत, भाजपावर टीका केली आहे, स्वत:वरील टीकेलाही योग्य शब्दात उत्तर दिलं आहे. त्याचसोबत काही चांगले निर्णय झाले तर त्याचं कौतुकही केले आहे. त्याचाच प्रत्यत पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे.
केंद्र सरकारने अलीकडेच जपानसोबत काही साम्यंजस्य करार केले आहेत, यात केंद्र सरकारने Specified Skilled Workers या क्षेत्रातील भागीदारीसाठी जपानसोबत केलेल्या कराराचं आमदार रोहित पवार यांनी स्वागत केले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे भारत व जपान यांच्यातील सहकार्य आणि भागीदारीसाठी संस्थात्मक यंत्रणा उभारली जाईल असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला आहे.
त्याचसोबत आवश्यक कौशल्य प्राप्त केलेले आणि जपानी भाषा अवगत असणारे भारतीय मनुष्यबळ जपानमधील विविध १४ क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी पाठवणं सोपं होईल, या संधीचा फायदा देशातील सर्व राज्यातील युवांना समान पद्धतीने मिळावी अशी विनंतीही आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे.
पंतप्रधान @narendramodi साहेबांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारने Specified Skilled Workers या क्षेत्रातील भागीदारीसाठी जपानसोबत केलेला सहकार्य करार स्वागतार्ह आहे. यामुळं भारत व जपान यांच्यात सहकार्य व भागीदारीसाठी संस्थात्मक यंत्रणा उभारली जाईल. pic.twitter.com/286TNjeg6S
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 7, 2021
केंद्रीय कॅबिनेटने भारत आणि जपान यांच्यात कुशल कामगारांच्या भागीदारीसाठी साम्यंजस्य करार करण्याला हिरवा कंदील दाखवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याला मंजुरी देण्यात आली. या अंतर्गत भारत आणि जपान यांच्यात सहकार्य आणि भागीदारी असलेली संस्थात्मक यंत्रणा उभी राहील. त्यामुळे भारत आणि जपान यांच्या नागरिकांमधील एकमेकांची संपर्क वाढण्यास मदत होणार आहे.
या करारानुसार भारतातील कुशल कामगारांना जपानमध्ये पाठण्यास सहकार्य मिळेल, जपानमधील १४ विविध क्षेत्रात कौशल्य असणारे भारतीय कामगार काम करतील, ज्यांनी कौशल्य योग्यता प्राप्त करून जपानी भाषेची परीक्षा पास केली आहे. या करारानुसार नर्सिंग देखरेख, इमारतींची साफसफाई, साहित्य प्रक्रिया उद्योग, औद्योगिक मशिनरी उत्पादन उद्योग, उद्योगांशी संबंधित इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रॉनिक माहिती, बांधकाम, जहाज बांधणी आणि जहाज संबंधित उद्योग, वाहनांची देखभाल, विमान, तात्पुरते निवास व्यवस्था, शेती, मत्स्यपालिका, खाद्य वस्तू आणि पेय उत्पादन उद्योग, खानपान सेवा उद्योग यासारख्या १४ क्षेत्रातील कुशल भारतीय कामगारांसाठी जपानमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जातील.