१०० कोटी रुपये म्हणजे काही गोळ्या, बिस्किटं नाहीत, पडळकरांचा शशिकांत शिंदेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2021 11:24 PM2021-01-24T23:24:52+5:302021-01-24T23:25:49+5:30
Politics News : भाजपाचे नेते गोपिचंद पडळकर यांनी १०० कोटींच्या ऑफरच्या दाव्यावरून शशिकांत शिंदे यांना टोला लगावला आहे.
पिंपरी-चिंचवड - भाजपाकडून पक्षात प्रवेश करण्यासाठी आपल्याला १०० कोटी रुपये आणि मंत्रिपदाची ऑफर देण्याच आली होती, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांनी केल्याने राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. या दाव्यावरून भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून उलट-सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, भाजपाचे नेते गोपिचंद पडळकर यांनी १०० कोटींच्या ऑफरच्या दाव्यावरून शशिकांत शिंदे यांना टोला लगावला आहे.
शशिकांत शिंदेंनी केलेल्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना पडळकर म्हणाले की, काही लोकांकडून बोलून बडबड करून पक्षातील स्थान भक्कम करायचा प्रयत्न सुरू आहे. हे निवडणूक हरलेले आहे. यांना कोण कशासाठी १०० कोटी रुपये देईल. १०० कोटी म्हणजे काय गोळ्या बिस्किटं नाहीत. यांना घोटाळे करायची सवय झाली आहे. त्यामुळे त्यांच्या डोक्यात मोठे आकडे येतात, असा टोल पडळकर यांनी लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार शशिकांत शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आपल्याला भाजपाकडून पक्षात प्रवेश करण्याची ऑफर आली होती. त्यावेळी मला १०० कोटी रुपये तसेच मंत्रिपद देण्याची ऑफर दिली गेली होती. मात्र मी पक्ष सोडला नाही, असा दावा केला होता.
दरम्यान, भाजपाची सत्ता असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाले होते. मात्र प्रत्यक्षात निवडणूक झाल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलल्याने भाजपाला विरोधात बसावे लागले आहे. त्यामुळे भाजपात गेलेल्यांची निराशा झाली आहे.