हे तर चर्चेपासून पळ काढणारे पळपुटे सरकार - देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2021 05:50 AM2021-03-01T05:50:11+5:302021-03-01T05:50:24+5:30
अधिवेशनात जाब विचारणार असल्याचे केले स्पष्ट
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ज्यातील तीन पायांच्या सरकारला कुठलीच चर्चा नको आहे. चर्चेपासून पळ काढणारे हे इतिहासातील सर्वात छोटे अधिवेशन असल्याचा आरोप करतानाच या अधिवेशनात कोरोना काळातील भ्रष्टाचार, वीज बिलांची वसुली, महिला अत्याचार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सभागृहात आवाज उठविणार असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर विशेषतः शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. बदल्या हेच या सरकारचे एकमेव काम आहे. आयएएस आणि आयपीएस बदल्यांमध्येसुद्धा भ्रष्टाचार सुरू आहे. असा दुर्दैवी प्रकार राज्यात यापूर्वी नव्हता. शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. ना कर्जमाफी मिळाली, ना प्रोत्साहन रक्कम. बोंडअळीमुळे कापूस गेला, ९० टक्के सोयाबीन गेले, पण शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. कोरोना काळात न वापरलेल्या विजेची अव्वाच्या सव्वा बिले आली. दोन वेळा या सरकारने वीज दरवाढ केली. आतापर्यंत साडेतीन लाख वीज कनेक्शन या सरकारने कापली. ७५ लाख लोकांना नोटिसा पाठविल्या. वीजबिलांच्या वसुलीचा हा प्रकार म्हणजे मोगलाई आहे, अशा शब्दांत फडणवीस यांनी राज्य सरकारला फटकारले.
महिला अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. सत्तापक्षाचे नेते आणि मंत्रीच या अत्याचारात आघाडीवर आहेत. सामान्यांसाठी आणि सत्तापक्षासाठी वेगवेगळे न्याय आहेत. स्वतःच्या नेत्यांना लैंगिक स्वैराचाराची मुभाच दिली गेली आहे. शक्ती कायदा एक फार्स आहे. त्यामुळे या कायद्यासाठीच्या संयुक्त समितीतून भाजप आमदार बाहेर पडणार असल्याचा इशाराही फडणवीसांनी दिला.
‘सत्तेसाठी इतकी लाचारी नको’
काँग्रेसने कायमच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला. त्यांच्या नादी लागून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सावरकरांचा अपमान करत आहेत. त्यांच्या पुण्यतिथीला ना अभिवादन केले, ना एक ट्विट. सत्ता येते, जाते. पण इतिहास सत्तेसाठी किती लाचारी स्वीकारतो त्याची नोंद करतो. शिवसेनेने सत्तेसाठी इतकी लाचारी पत्करू नये, असे फडणवीस म्हणाले.