Maharashtra Election 2024: "...तर ती नोटीस महाराष्ट्रासमोर जाहीर करावी"; रुपाली चाकणकरांचं सुप्रिया सुळेंना आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 10:03 AM2024-11-11T10:03:25+5:302024-11-11T10:04:41+5:30
Supriya Sule Rupali Chakankar News: अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील टिंगरे यांनी शरद पवारांना नोटीस पाठवली असल्याचा दावा सुप्रिया सुळे यांनी केला. रुपाली चाकणकर यांनी ती नोटीस दाखवावी, असे आव्हान दिले आहे.
Supriya Sule Rupali Chakankar: पुणे शहरातील कल्याणीनगरमधील पोर्श कार अपघात प्रकरणात बदनामी केली, तर कोर्टात खेचीन, अशी नोटीस सुनील टिंगरे यांनी शरद पवार यांना पाठवली असल्याचे सुप्रिया सुळे यांनी प्रचार सभेत म्हटले. आता यावरूनच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी उलट सवाल करत घेरलं आहे.
वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार सुनील टिंगरे हे पुन्हा निवडणूक लढवत आहेत. कल्याणीनगरमधील पोर्श कार अपघात प्रकरणात त्यांचं नाव चर्चेत आलं होतं. त्यावरून शरद पवारांनी जाहीरसभेत टीका केली होती. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत सुप्रिया सुळेंनी टिंगरेंनी नोटीस पाठवल्याचा दावा केला.
"ज्या हाताने गेल्यावेळी एबी फॉर्म दिला, त्यात हातात सुनील टिंगरे यांनी नोटीस दिली", असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्यांचा दावा सुनील टिंगरेंनी फेटाळून लावला. आता रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळेंना आव्हान दिले आहे.
"संसदरत्न सुप्रिया सुळे यांनी वडगाव शेरी येथे प्रचार सभेत एक विधान केले की, सुनील टिंगरे यांनी पवार साहेबांना नोटीस पाठवली. या विधानामध्ये काहीही तथ्य नाही. जर नोटीस पाठवली असेल तर ती महाराष्ट्रासमोर जाहीर करावी", असे आव्हान रुपाली चाकणकर यांनी दिले.
संसदरत्न सुप्रिया सुळे यांनी वडगाव शेरी येथे प्रचार सभेत एक विधान केले की सुनिल टिंगरे यांनी पवार साहेबांना नोटीस पाठवली,या विधानामध्ये काहीही तथ्य नाही.
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) November 10, 2024
जर नोटीस पाठवली असेल तर ती महाराष्ट्रासमोर जाहीर करावी.
तसेच ज्या उमेदवाराला तुतारी गटाने उमेदवारी दिली आहे,ते बापू पठारे… pic.twitter.com/TdtsVuoDlY
"तसेच ज्या उमेदवाराला तुतारी गटाने उमेदवारी दिली आहे, ते बापू पठारे यांच्यावर त्यांच्याच सुनेने विनयभंग, शारीरिक व मानसिक अत्याचाराचे गुन्हे दाखल केले आहेत. सुप्रिया सुळे हाच का तुमचा महिला सन्मान?", असा सवालही रुपाली चाकणकर यांनी केला आहे.