Sachin Vaze: वर्षावर हालचाली वाढल्या; पोलीस महासंचालक, आयुक्तांसोबत मुख्यमंत्र्यांची मध्यरात्रीपर्यंत खलबते
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 08:12 AM2021-03-17T08:12:51+5:302021-03-17T08:13:42+5:30
Sachin Vaze Case: अंबानींच्या घरासमोर ठेवलेल्या स्फोटकांच्या कटाची सूत्रे एका आयपीएस अधिकाऱ्याने हलविल्याचा आरोप भाजपा नेते किरिट सोमय्या यांनी केला आहे. दरम्यान, सचिन वाझे वापरत असलेली मर्सिडीज कार एनआयएने ताब्यात घेतली. यामधून बॅग, डायरी, शर्ट आणि पाच लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे.
सचिन वाझे प्रकरणावरून (Sachin Vaze Case) राज्य सरकार चांगलेच अडचणीत आले असून कोणाचीतरी विकेट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अनिल देशमुखांना (Anil Deshmukh) हटविण्याची मागणी जोर धरत होती. तर दुसरीकडे पोलीस आयुक्तांना बदलण्याची चर्चा सुरु होती. या साऱ्या पार्शभूमीवर काल मध्यरात्रीपर्यंत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांसोबत हायलेव्हल बैठक सुरु होती. (CM Uddhav Thackeray discussed on Sachin Vaze Case with Police officers.)
राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर आले होते. बैठकीला पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि गृहमंत्री अनिल देशमुख, अनिल परबही उपस्थित होते. या बैठकीमध्ये सचिन वाझे प्रकरणावर दीर्घकाळ चर्चा झाली. मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास ही बैठक सुरु झाली ती सुमारे चार तास सुरु होती. मध्यरात्रीनंतर मंत्री आणि पोलीस अधिकारी वर्षा बंगल्यावरून परतले.
अंबानींच्या घरासमोर ठेवलेल्या स्फोटकांच्या कटाची सूत्रे एका आयपीएस अधिकाऱ्याने हलविल्याचा आरोप भाजपा नेते किरिट सोमय्या यांनी केला आहे. दरम्यान, सचिन वाझे वापरत असलेली मर्सिडीज कार एनआयएने ताब्यात घेतली. यामधून बॅग, डायरी, शर्ट आणि पाच लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे.
सचिन वाझे यांचे तीन अर्ज एनआयए कोर्टाने फेटाळले
सचिन वाझे यांना मुंबई सत्र न्यायालयाने दणका दिला आहे. वाझे यांचे तीन अर्ज एनआयए कोर्टाने फेटाळले. एनआयए कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत आणि अटक बेकायदेशीर असल्याचा त्यांचा दावा अमान्य केला आहे. केवळ वकिलांना भेटू देण्याची मागणी कोर्टाने अंशत: मान्य केली. चौकशीच्यावेळी वकिलांना सोबत राहण्याची मुभा देण्यात आली.
शरद पवारांसोबत राऊतांची भेट
"सगळं आलबेल आहे. शरद पवार यांना मी नेहमी भेटत असतो. ही भेट सचिन वाझे प्रकरणावर नव्हती. नाराजीचा कुठलाही प्रश्न नाही. शरद पवार यांची नाराजी कधी दिसत नसते ते चिंतन करत असतात.", असे पवार भेटीवर संजय राऊतांनी सांगितले. तर गेल्या दोन दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये बैठका सुरु आहेत. यावर अजित पवारांनी ही नेहमीची समन्वय बैठक असल्याचे सांगितले. तसेच दोषी कोणीही असला तरीही त्याच्यावर कारवाई केली जाणार असे ते म्हणाले होते.